ठाणे : मविआत जागावाटपाचे अंतिम होत नसल्याने अखेर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील घटक पक्षांनी योग्य सन्मान दिला नसल्याचा आरोप करीत स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु चव्हाण यांची समजूत काढली जाईल, असे मत राष्ट्रवादी (शप गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील पत्रकार परिषदेत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केले. काँग्रेसने सुरुवातीला ३५ जागांची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी (शप) आणि उद्धव सेनेकडून केवळ १० जागांची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तरीही आम्ही तडजोड करत २५ जागांवर तयार होतो, पण तो प्रस्तावही स्वीकारला नसल्याचे त्यांनी सांगितले. कालच राजकारणात आलेले मनसे त्यांना प्रिय झाले आहेत. मात्र अडचणीच्या काळात काँग्रेसने नेहमीच साथ दिली, तरीही आज आम्हाला डावलले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसने उद्धव सेना आणि शरद पवार गटाला मदत केली होती. पण आज जितेंद्र आव्हाड आमच्याच विरोधात उघडपणे टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच आता स्वबळाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात राष्ट्रवादी (शप) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस मविआचा घटक असल्याने नाराज असलेल्या चव्हाण यांची समजूत काढली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच जागावाटपाचा फॉर्म्युला मंगळवारी दुपारी जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजप आणि शिंदे सेनेला रोखयचे असले तर सर्वांना एकत्र लढावेच लागेल, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.