ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण; घरीच उपचार सुरू; गंभीर लक्षणे नाहीत, सर्तक राहण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण; घरीच उपचार सुरू; गंभीर लक्षणे नाहीत, सर्तक राहण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
Published on

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण स्थितीची माहिती घेतली. शुक्रवारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी चेतना नितील यांनी या बैठकीत दिली. सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. आरटीपीसीआरची सुविधाही कळवा येथे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिव्हिल, कळवा रुग्णालय सज्ज

कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून, पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात ४० खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून, या मध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत. ठाणे सिव्हिल तसेच कळवा रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे. याशिवाय, रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकते. शहरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये, मॉल्स आणि बाजारपेठांमध्येदेखील मास्क व सॅनिटायझर वापरासंबंधी सूचना दिल्या गेल्या आहेत. सर्व संस्थांना निर्देश दिले आहेत की, लक्षणे असलेल्यांना उपस्थित राहू न देता तातडीने तपासणीसाठी पाठवावे.

- डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे )

कोविडसाठी नवी मुंबई महापालिका दक्ष

नवी मुंबई : राज्यातील काही भागात सध्या कोविड रुग्ण आढळल्याच्या बातम्या येत आहेत. त्या अनुषंगाने काळजी म्हणून ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून आल्यास खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काही बाबींचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानुसार ‘काय करावे आणि काय करू नये' याबाबत सूचनांचे पालन करावे, असे महापालिकेच्या वतीने नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. सध्याचा कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागांतर्गत सर्व रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रे यांना व्हीसीद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यादृष्टीने खबरदारी घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार ‘नमुंमपा'च्या वाशी, नेरूळ, ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ बेडस्‌ राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तसेच माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालय, नेररूळ येथे चाचणी लॅब देखील उपलब्ध आहे.

नवी मुंबईकर नागरिकांनी कोविडबाबत घाबरून न जाता आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आवश्यक दक्षता घेण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता नाहक भितीचे वातावरण पसरवू नये. मात्र, सर्दी, खोकला, पल्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. तसेच वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि आपल्या नजीकच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

logo
marathi.freepressjournal.in