बेकायदेशीर खासगी स्कूल व्हॅनचालकांवर कारवाई; प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम

बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल व्हॅन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
बेकायदेशीर खासगी स्कूल व्हॅनचालकांवर कारवाई; प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम
Published on

ठाणे : बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल व्हॅन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभाग आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गेल्या सहा दिवसांत २०२ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ४७ वाहने कोणत्याही वैध परवाना आणि सुरक्षिततेच्या निकषांशिवाय विद्यार्थी वाहतूक करत असल्याचे उघड झाले आहे. शालेय वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या प्रथमोपचार पेटी, जीपीएस यंत्रणा, योग्य आसनव्यवस्था, फिटनेस प्रमाणपत्र यांसारख्या आवश्यक सुविधा अनेक वाहनांमध्ये नव्हत्या. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून नेले जात असल्याचेही निरीक्षण करण्यात आले. वागळे इस्टेट, कोपरी, घोडबंदर, माजिवडा आणि कळवा परिसरात सकाळच्या वेळी विशेष पथकाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बेकायदेशीर वाहने चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जात आहे आणि ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.

रोहित काटकर, अधिकारी उप प्रादेशिक परिवहन

शाळा सुरू होताच कारवाईने खळबळ

अलीकडील काही दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यामुळे खाजगी स्कूल व्हॅनचालकांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय पालकवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण करत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in