ठाण्यात आज पाहायला मिळणार दहीहंडीचा जल्लोष; थरावर थर आणि लाखांची बक्षिसे; मंडळांमध्ये मोठी चुरस

ठाणे शहरात शनिवार, ५ सप्टेंबरला दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उंचच उंच मानवी पिरॅमिड (थर) रचणाऱ्या गोविंदा पथकांसाठी आयोजकांनी लाखांची बक्षीसे जाहीर केली असून क्रीडा, कौशल्य आणि थराराचा संगम या उत्सवात पाहायला मिळणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

फरियाल सय्यद/ठाणे

ठाणे शहरात शनिवार, ५ सप्टेंबरला दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उंचच उंच मानवी पिरॅमिड (थर) रचणाऱ्या गोविंदा पथकांसाठी आयोजकांनी लाखांची बक्षीसे जाहीर केली असून क्रीडा, कौशल्य आणि थराराचा संगम या उत्सवात पाहायला मिळणार आहे.

श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करणारा हा पारंपरिक सण आता एका भव्य साहसी खेळात रूपांतरित झाला आहे. राजकीय नेते आणि स्थानिक संस्थांच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेत ९ आणि १० थरांचे विक्रम मोडण्यासाठी पथके सज्ज झाली आहेत.

पाचपाखडी आणि हिरानंदानी मीडोज

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानतर्फे सर्वाधिक ७१ लाख रुपयांचा बक्षीस निधी ठेवण्यात आला आहे तसेच सर्व सहभागी गोविंदांसाठी सेफ्टी हार्नेस आणि पूर्ण विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कॅसल मिल (गोकुळ दहीहंडी) : उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यातर्फे आयोजित या दहीहंडीसाठी ५५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.

वर्तकनगर : आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे २१ लाख ते ५१ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत. जागतिक विक्रमांचे व्यासपीठ म्हणून हा सोहळा ओळखला जातो.

रहेजा पार्क : संकल्प प्रतिष्ठानच्या २१ व्या वर्षाचे औचित्य साधून आमदार रवींद्र फाटक यांनी जागतिक विक्रम मोडणाऱ्या पथकासाठी २१ लाखांचे विशेष बक्षीस आणि महिला पथकांसाठी स्वतंत्र रोख पारितोषिके जाहीर केली आहेत.

टेंभी नाका : स्व. आनंद दिघे यांच्या परंपरेतील या ऐतिहासिक दहीहंडीत ११ लाख ते २५ लाख रुपयांहून अधिकची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

इतर प्रमुख आयोजक

पाचपाखडी येथील आमदार जितेंद्र आव्हाड (११ लाख ते २५ लाख रुपये) आणि नौपाडा येथील अविनाश जाधव (११ लाख ते २१ लाख रुपये) यांच्या दहीहंडीचा समावेश आहे. मंडळांमध्ये यामुळे मोठा उत्साह आहे.

विशेष उपक्रम आणि चोख सुरक्षा

दिव्यांग मुलांसाठी बाळकुम आणि नौपाडा येथे विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्तालयाने ५ विभागांमध्ये (झोन) २५४ सार्वजनिक कार्यक्रमांना मंजुरी दिली आहे. गर्दीचे नियोजन, सीसीटीव्ही देखरेख, साध्या वेषातील पोलिसांची नियुक्ती आणि गस्त वाढवून शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in