ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात

गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्हा बाळा...मटकी संभाल रे ब्रीजबाला..आदी घोषणांच्या नादात गोपाळकाला जोरदार साजरा केला जातो. गोपाळकालानिमित्त ठाण्याच्या विविध भागात मोठमोठ्या दहीहंडी उभारल्या जाणार आहेत.
ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात
ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनातसंग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्हा बाळा...मटकी संभाल रे ब्रीजबाला..आदी घोषणांच्या नादात गोपाळकाला जोरदार साजरा केला जातो. गोपाळकालानिमित्त ठाण्याच्या विविध भागात मोठमोठ्या दहीहंडी उभारल्या जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात ‘थर’थराट पाहायला मिळणार आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ५ सप्टेंबरला होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये २३०७ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पाचही परिमंडळांत यंदा एकूण २५३ दहीहंड्या आयोजित होण्याची शक्यता आहे. यामध्ये ११०४ पथके, १५७ मिरवणुका आणि ५४ सार्वजनिक कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय ३४ मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

कल्याणमध्ये सर्वाधिक मोठ्या हंड्या

मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्यांच्या संख्येत कल्याण परिमंडळ आघाडीवर आहे. कल्याणमध्ये ११, वागळे इस्टेटमध्ये ८, भिवंडीत ६, उल्हासनगरमध्ये ५, तर ठाणे परिमंडळात ४ मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन होणार आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे.

२,३०७ पोलिसांचा फौजफाटा

दहीहंडी उत्सवासाठी पाचही परिमंडळांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी, अंमलदार, महिला आणि पुरुष पोलिस कर्मचारी, होमगार्ड तसेच राखीव दलाची मदत घेण्यात येणार आहे. एकूण २३०७ मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. याशिवाय गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गर्दीचे नियंत्रण, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था आणि संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. विविध विभागांतील राखीव मनुष्यबळही बंदोबस्तासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.

कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव’

जन्माष्टमीच्या उत्साहाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी शिवसेना कोपरी विभाग, ठाणे (पूर्व) यांच्या वतीने भव्य ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ आयोजित केला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, अनेक लोकप्रिय मराठी कलाकारही दहीहंडी उत्सवाला भेट देणार आहेत.

विजेत्या गोविंदा पथकासाठी तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गोविंदा पथकाला रोख पारितोषिकासह आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय विविध थरांसाठीही आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.९ थरांसाठी ५५ हजार रुपये, आठव्या थरासाठी २१ हजार रुपये, सातव्या थरासाठी ११ हजार रुपये, सहाव्या थरासाठी ६ हजार रुपये आणि पाचव्या थरासाठी ५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

अतिरिक्त कुमकही तैनात

आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असून, वरिष्ठ स्तरावरूनही बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी

दहीहंडी उत्सव हा ठाणे आणि मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. या दिवशी होणारी गोविंदा पथकांची गर्दी आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेता ५ सप्टेंबरला ठाणे आणि मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in