खान कंपाऊंड आता 'ग्रीन झोन'; मुंब्रा-शिळ परिसरातील २१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त, हरित क्षेत्रात रूपांतराची महापालिकेची तयारी

मुंब्रा-शिळ परिसरातील खान कंपाऊंडमधील २१ अनधिकृत इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर जमीनदोस्त केल्या असून, या संपूर्ण क्षेत्राला 'ग्रीन झोन' म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने येथे वृक्ष लागवड सुरू केली असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण परिसर हरित बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
खान कंपाऊंड आता 'ग्रीन झोन'; मुंब्रा-शिळ परिसरातील २१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त, हरित क्षेत्रात रूपांतराची महापालिकेची तयारी
Published on

ठाणे : मुंब्रा-शिळ परिसरातील खान कंपाऊंडमधील २१ अनधिकृत इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर जमीनदोस्त केल्या असून, या संपूर्ण क्षेत्राला 'ग्रीन झोन' म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने येथे वृक्ष लागवड सुरू केली असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण परिसर हरित बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून खान कंपाऊंड परिसरात झपाट्याने अनधिकृत बांधकामे उभी राहत होती. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित कारवाईस १३ जूनपासून सुरुवात केली. गट क्रमांक १७८, १७९ आणि १८० या भागात उभारलेल्या १७अनधिकृत इमारतींवर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान काही रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत, संबंधित रहिवाशांना २३ जूनपर्यंत जागा रिकामी करण्याची मुदत दिली. मुदत संपल्यानंतर उर्वरित इमारतींवरही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान, मूळ आकडेवारीत १७ इमारती असल्याचे नमूद होते. मात्र, प्रत्यक्षात ४ अतिरिक्त अनधिकृत इमारती असल्याचे उघड झाल्याने एकूण २१ इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस महापालिकेच्या बंदोबस्ताच्या सहाय्याने राबवण्यात आली. माहितीनुसार, या संपूर्ण क्षेत्राची पूर्वीची स्थिती 'हरित क्षेत्र' म्हणजेच ग्रीन झोन म्हणून नोंदवलेली होती. त्यामुळेच या जागेवर अनधिकृत बांधकामे केल्याने ती नियमबाह्य ठरत होती. आता या जागेचा मूळ उपयोग टिकवून ठेवत महापालिकेने येथे वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पाडलेल्या एका इमारतीच्या जागेवर वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण परिसरात अशाच प्रकारे झाडांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांना हिरवळयुक्त श्वास घेण्याजोगे वातावरणही मिळणार आहे.

या कारवाईसाठी लागलेला संपूर्ण खर्च संबंधित बांधकामधारकांवर टाकण्यात येणार असून, महापालिकेने त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत बांधकामे ही कायद्याविरोधात असल्यामुळे महापालिका आता अशा प्रकरणांमध्ये अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

पर्यावरणपूरक पुढाकार

खान कंपाऊंड परिसरात वृक्ष लागवडीत स्थानिक वड, पिंपळ, आंबा, अशोक, गुलमोहर यांसारख्या स्थानिक प्रजातींचा समावेश केला जाणार आहे. यामुळे परिसराचा तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल तसेच जैवविविधतेलाही चालना मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in