Thane : डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ; जुलै महिन्यात रुग्णांची संख्या अधिक; दिवा, माजिवडा-मानपाडा आणि नौपाडा प्रभाग समिती आघाडीवर

ठाणे महापालिका हद्दीत जुलै महिन्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. खासगी रुग्णालयात तर अशा रुग्णांसह व्हायरल तापाच्या आजाराचे रुग्ण दाखल होत असल्याने रुग्णालयातील बेड देखील फुल्ल होत असल्याचे दिसत आहे.
Thane : डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ; जुलै महिन्यात रुग्णांची संख्या अधिक; दिवा, माजिवडा-मानपाडा आणि नौपाडा प्रभाग समिती आघाडीवर
Published on

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत जुलै महिन्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. खासगी रुग्णालयात तर अशा रुग्णांसह व्हायरल तापाच्या आजाराचे रुग्ण दाखल होत असल्याने रुग्णालयातील बेड देखील फुल्ल होत असल्याचे दिसत आहे. कळवा रुग्णालयात देखील अशा स्वरूपाचे रुग्ण दाखल होत असल्याने या रुग्णालयाचा ताणही वाढला आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सर्तक असून त्या दृष्टीने उपाययोजना देखील हाती घेतल्या आहेत. असे असले तरी ठाण्यात जुलै महिन्यात मलेरियाचे १२३, डेंग्यूचे १२७, टायफॉईडचे २७ आणि चिकनगुनियाचे २९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही यात दिवा, माजिवडा-मानपाडा आणि नौपाडा प्रभाग समिती आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर विविध ठिकाणी पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होते. या आजारांनी डोके वर काढू नये म्हणून आरोग्य यंत्रणांकडून काळजी घेण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून निर्माणाधीन इमारती, पंक्चर टायर दुरुस्ती दुकाने, गॅरेज, अशा सर्वांना पालिकेकडून नोटिसा बजावण्यात येतात आणि त्यात पावसाचे पाणी साठणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. अशाचप्रकारे ठाणे महापालिकेने यंदाही काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी, शहरात डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यात या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असून जुलै महिन्यात पुन्हा हा आकडा वाढल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in