ठाण्यात ‘देवाभाऊ’ जाहिरात प्रकरण चिघळले; छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर रंग फासल्याने संताप; काँग्रेसची कळवा पोलीस ठाण्यात धडक

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शिवमुद्रेवर रंग फासून झाकण्यात आले, तर ‘देवाभाऊ’ हा शब्द मात्र तसेच ठेवण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा झालेला हा घोर अपमान उघड होताच शहरभर संतापाची लाट उसळली.
ठाण्यात ‘देवाभाऊ’ जाहिरात प्रकरण चिघळले
ठाण्यात ‘देवाभाऊ’ जाहिरात प्रकरण चिघळलेछायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासोबत ‘देवाभाऊ’ असा उल्लेख आणि शिवमुद्रा तसेच फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करतानाची चित्ररूपे ठाणे शहरातील अनेक भिंतींवर रंगविण्यात आली होती. या जाहिरातबाजीमुळे शहरातील सुशोभीकरण केलेल्या भिंती विद्रूप झाल्याची चर्चा तेव्हाच झाली होती.

याच चित्रांपैकी कळवा रेल्वे स्टेशन परिसरातील भिंतीवरची प्रतिमा अज्ञात व्यक्तींनी विद्रूप केली.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शिवमुद्रेवर रंग फासून झाकण्यात आले, तर ‘देवाभाऊ’ हा शब्द मात्र तसेच ठेवण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा झालेला हा घोर अपमान उघड होताच शहरभर संतापाची लाट उसळली.

छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर रंग फासल्याने संताप
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर रंग फासल्याने संतापछायाचित्र : दीपक कुरकुंडे

या प्रकाराची गंभीर दखल घेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने कळवा पोलीस ठाण्यात दाखल झाले. धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक वैमनस्य निर्माण करणे, कटकारस्थान आणि बदनामी अशा गंभीर गुन्ह्यांसाठी गुन्हा नोंदवण्याची औपचारिक मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.

काँग्रेसची कळवा पोलीस ठाण्यात धडक
काँग्रेसची कळवा पोलीस ठाण्यात धडकछायाचित्र : दीपक कुरकुंडे

यावेळी ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, निलेश पाटील, ॲड. जावेद शेख, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, नुर्शिद शेख, मनोज डाकवे, वैशाली भोसले, विजय खेडेकर, दयानंद पवळ, पद्मिनी खराडे, कृष्णा म्हासने, राजू ढवळे, नियाझ कुरणे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते. ठाण्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in