ठाणे : नावीण्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, तसेच मुंबई महानगर प्रदेश कायमस्वरूपी तोडगा क्षेत्रातील वाढत्या वाहतूककोंडीवर काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ज्ञ समितीची नेमणूक करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसेच अनेक आमदार, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सन २०२४-२५ मधील ११६७.३७ कोटी निधीपैकी ९९.९८% खर्च झाल्याचे सांगण्यात आले. तर, सन २०२५-२६ मध्ये (ऑगस्ट अखेरपर्यंत) एकूण १२५२.९९ कोटी निधीपैकी २३% खर्च झाला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी या वर्षीचा जिल्हा वार्षिक नियोजनचा खर्च १००% सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे 'स्मार्ट आरोग्य केंद्रात' आणि जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा 'स्मार्ट शाळांमध्ये' रूपांतरित करण्यात येतील. यासाठी सीएसआर आणि लोकसहभागातून निधी उपलब्ध करण्याचे आवाहन करण्यात आले.
वाहतूककोंडीवर नियंत्रणासाठी ड्रोन आणि AI आधारित ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांचे सौरऊर्जेद्वारे सौरीकरण (रूफ टॉप सोलर) करण्यात येणार आहे.
ठाण्यातील ३९ पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यावर आणि 'Explore Thane -Tourism App'बद्दल चर्चा झाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ आणि मराडेपाडा विकास आराखड्यासाठी (रु. ८० कोटी) चर्चा करण्यात आली. कौशल्यवृद्धी, शैक्षणिक उपक्रम, पर्यटन, पायाभूत सुविधा यांसारख्या नावीण्यपूर्ण योजनांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
क्षेत्रातील सोडवण्यासाठी एमएमआर वाहतूककोंडी एमएमआरडीए तज्ज्ञ समिती नेमणार आहे. ही समिती वाहतूककोंडीचा अभ्यास करून कायमस्वरूपी तोडगा काढेल. शिंदे यांनी सर्व यंत्रणांना समन्वय साधून तत्काळ, मध्यकालीन व दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले.
पाणीटंचाई आणि पूरग्रस्तांना मदत
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा झाली. चिखली धरणाची उंची वाढवणे आणि उल्हास नदीतून उल्हासनगरसाठी पाण्याचा मूळ स्रोत तयार करण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काळू डॅम आणि पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील पूरग्रस्त भागाला मदत करताना नियम व अटी शिथिल करून, सरकार मदत करताना हात आखडता घेणार नाही. पूरग्रस्त बांधवांसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यासाठी आणि त्याचे क्षेत्र वाढवण्यासाठी चर्चा झाली. शेतकऱ्यांचा फायदा होईल अशा प्रकारची पिके घेऊन, गेल्या वर्षीचे ७००० हेक्टरवरील क्षेत्र यावर्षी आणखी वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "सेवा संवाद" या जलद आणि सोप्या अभिप्राय सेवेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपा ते खारेगाव या २४ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
त्यांनी रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. या रस्त्याचा ठेका 'मिहान एंटरप्राइजेस' नावाच्या कंपनीने घेतला असला, तरी या ठेक्यांमध्ये माजी केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मुलाचा हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप खासदार बाळ्या मामा यांनी केला आहे. यामुळेच दोषी ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निकृष्ट कामाबाबत आपण यापूर्वी एमएसआरडीसी आयुक्तांना भेटलो होतो, तेव्हा त्यांनी ठेकेदाराला तत्काळ ब्लॅक लिस्ट करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
रस्त्याचे ६६ टक्के काम निकृष्ट
खासदार बाळ्या मामा यांनी या रस्त्याचे स्वतः 'थर्ड पार्टी ऑडिट' केले असल्याचा दावा बैठकीत केला. रस्त्यावरील एकूण ३६ हजार पॅनलपैकी केवळ २१ पॅनलचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले. यापैकी तब्बल १४ पॅनलचे अहवाल निकृष्ट (खराब) आढळले. याचा अर्थ, रस्त्याचे ६६ टक्के काम निकृष्ट झाल्याचा अहवाल त्यांच्याकडे आहे. ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सहा वर्षांत पूर्ण होतो, मग अवघ्या २४ किलोमीटरचा वडपा-खारेगाव रस्ता अजूनही अपूर्ण का, असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.