
ठाणे : ठाणे शहराच्या टेंभी नाका परिसरातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या मठाजवळ सुरू असलेल्या एका खासगी इमारतीच्या बांधकामावेळी काही नक्षीकाम केलेले प्राचीन दगडी अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे. या तुकड्यांमध्ये प्राचीन मंदिरांच्या खांबांचे, तुळयांचे वा शिल्पांचे अवशेष असल्याचा संशय व्यक्त होत असून, हे अवशेष भूमीमध्येच टाकून देण्यात येतील की चोरीला जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कैलास म्हापदी यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी तातडीने पुरातत्त्व विभागाला याप्रकरणी शास्त्रशुद्ध चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. भिवंडीतील लोणाड येथे शिलाहार कालीन राजपत्र सापडले होते, पण सध्या ते एका कोपऱ्यात पडून आहे. त्याचप्रमाणे कौपीनेश्वर मंदिराचीही दुरवस्था झाली असून, जीर्णोद्धाराचा प्रकल्प रखडला आहे.
मंदिराचा सभामंडप देखील अलीकडेच धोकादायक झाल्यामुळे तोडण्यात आला आहे. ठाण्यात हजुरी येथे महापालिकेच्या सहकार्याने प्राच्यविद्या संग्रहालय असूनही, अशा ठेव्यांबाबत पुरेसे जनजागृती नाही. कै. हरिभाऊ शेजवळ, कै. दाऊद दळवी, सदाशिव टेटविलकर अशा प्राच्यविद्या संशोधकांनी ठाण्याला समृद्ध ऐतिहासिक ओळख दिली. त्यामुळे आता या वारशाचे योग्यरित्या संवर्धन करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
ठाण्याचा पुरातन वारसा धोक्यात
बाराशे वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या ठाण्याच्या श्रीकौपीनेश्वर मंदिरासारख्या वास्तू, महागिरी टेकडी, दगडी शाळा, चेंदणी कोळीवाडा, हिराकोट, खारकर आळी, बीवलकर वाडा यांसारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उत्खननात सापडलेले शिलालेख, मूर्ती व शिल्प हे अनेक वेळा जमीन भरावासाठी वापरण्यात आले आहेत, ही बाब इतिहासप्रेमींसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
पूर्वीही सापडलेले पुरावे
१९९५ ते २००० दरम्यान कासारवडवली, हिरानंदानी नाका, सिद्धेश्वर तलाव, चरई परिसरात अशा अनेक खुणा सापडल्या होत्या. त्यातील काही मूर्ती श्रद्धेने धर्मवीर आनंद दिघेच्या मठात ठेवण्यात आल्या आहेत. सिद्धेश्वर तलावाजवळील ब्रह्मदेवाची मूर्तीदेखील सध्या साध्या पद्धतीने जतन करण्यात आलेली आहे.
इतिहासात भर घालणारा शोध
सिद्धेश्वर मंदिराच्या उत्खननावेळी काही दिवसांपूर्वीच एक दुर्मिळ ब्रह्मा मूर्ती सापडली होती. त्याच पार्श्वभूमीवर टेंभी नाक्यावरील हे नवीन अवशेष देखील ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. इतिहासतज्ज्ञ सदाशिव टेटविलकर यांच्या मते, हे तुकडे कोणत्यातरी प्राचीन मंदिराचे अवशेष असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्याची योग्यप्रकारे तपासणी करून त्याचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.