
ठाणे प्रतिनिधी : डिजीटल अरेस्ट गुन्हयात फसवणूकीची रक्कम क्रिप्टो करन्सी माध्यमातून परदेशात पाठविणाऱ्या तीन जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात ठाणे पोलिसांना यश मिळाले आहे. ठाणे शहर पोलिसांच्या सायबर सेल ने या बाबत मोठी कारवाई केली आहे. सदर प्रकरणात मुंबईतील सत्कार पतपेढीचे अरमन किशोर बन्सीलाल जैन (६३), गारमेंट व इमीटेशन ज्वेलरी व्यावसायिक महेश पवन कोठारी (३६) आणि कॉस्मेटीकचा व्यावसायिक धवल संतोष भालेराव (२६) यांना गुरुवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर फोन करुन त्यांनी DHL कंपनीचे कुरिअर पार्सल पाठविल्याचे सांगून संपर्क करुन त्याने पाठविलेल्या पार्सल जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये १ लॅपटॉप, १४० ग्रॅम ए.डी. पावडर (अंमली पदार्थ थाई पासपोर्ट, ३ किडेट कार्ड, ४ किलो कपडे असल्याचे सांगून सदर पार्सलशी तुमचा संबंध नसल्यास पोलीसांना कळवा असे सांगण्यात आले.
याचदरम्यान सी बी आय अधिकारी असल्याचे भासवुन फिर्यादी यांना वेळावेळी कॉल करुन डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगून फिर्यादी यांना बनावट कागदपत्र पाठवून त्याच्या बँक खात्यात असलेली रक्कम आरोपी यांचे बँक खात्यावर तपासणीकरीता वळती करण्यास भाग पाडले. आरोपींनी एकूण ३ कोटी ०४ लाख रूपये रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती करून घेतली. फिर्यादी यांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी ८२ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम त्रिकुट यांनी युएसडीटीद्वारे परदेशात पाठविल्याचे निष्पन्न झाले.