दिवाळीत आकाशदीप उडविण्यास ठाणे जिल्ह्यात बंदी! आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आगीच्या दुर्घटना तसेच जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यात आकाशदीप (फ्लाइंग लॅन्टर्न) उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दिवाळीत आकाशदीप उडविण्यास ठाणे जिल्ह्यात बंदी! आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश
दिवाळीत आकाशदीप उडविण्यास ठाणे जिल्ह्यात बंदी! आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेशप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

ठाणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आगीच्या दुर्घटना तसेच जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यात आकाशदीप (फ्लाइंग लॅन्टर्न) उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यासंदर्भात मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आकाशदीप उडविणे, त्यांची विक्री करणे आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दिवाळी सणानिमित्त ५ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे होणार आहेत. या काळात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आकाशदीप उडविले जातात. मात्र, आकाशात उडविलेले आकाशदीप हवेत असताना पेट घेण्याची शक्यता असते. जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

ही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आकाशदीपांच्या वापरावर निर्बंध घालण्याची विनंती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

विक्री करणाऱ्याऱ्यांवर कारवाई

आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आकाशदीप उडविणे, त्यांची विक्री करणे तसेच साठवणूक करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करून आकाशदीप उडविणाऱ्या नागरिकांवर तसेच त्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)