

आषाढी एकादशीनिमित्त ठाणे शहरासह जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विविध विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली, तर ठिकठिकाणी दिंडी, पालखी आणि भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. शाळांमधील चिमुकल्यांनी वारकरी व संतांच्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. दुसरीकडे, पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी फळवाटप, फलाहार तसेच प्रवासासाठी टोल फ्री पासची व्यवस्था करून वारकऱ्यांची सेवा केली.
विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
ठाणे : आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. मुख्य बाजारपेठेतील सुमारे २०८ वर्षांची परंपरा असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
महापालिका गटनेते पवन कदम यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. दरम्यान, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर अभ्यासिका, ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी आणि ठाणे स्टेशन कॉम्प्युटर क्लासेस येथून दिंडी काढण्यात आली.
या दिंडीत संस्था संचलित विविध अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्रे व संगणक विभागांतील सुमारे ४,२०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
डोंबिवलीत छोट्या वारकऱ्यांची दिंडी
डोंबिवली : आषाढी एकादशीचे औचित्य साधून डोंबिवली शहरात विविध धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडले. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर 'हरी ॐ रेल्वे प्रवासी भजन मंडळा'च्या वतीने आयोजित आषाढी एकादशी सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
टाळ वाजवत यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. भजनाच्या कार्यक्रमात त्यांनी विठ्ठलभक्तांसमवेत हरिनामाच्या गजरात सहभाग घेतला. यावेळी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी विद्यामंदिरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश
स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या दिडीत इयत्ता पहिली ते सातवीचे सुमारे ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. मुख्याध्यापिका गीतांजली मुणगेकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही दिंडीत उत्साहाने सहभागी झाले. विद्यार्थ्यांना श्री विठ्ठल मंदिरात नेण्यात आले. यावेळी 'विठू माऊली'चा जयघोष करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीसोबतच सामाजिक आणि पर्यावरणविषयक संस्कारांची जपणूक करण्यात आली.
पंढरपुरात हजारो वारकरी भक्तांना फळांचे वाटप
भिवंडी : आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे दाखल झालेल्या हजारो वारकरी भक्तांची सेवा करण्यासाठी डी. वाय. फाऊंडेशनच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले.
फाऊंडेशनचे संस्थापक दयानंद चोरघे यांच्या पुढाकाराने वारकरी भक्तांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच ठाणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोल फ्री पासची विशेष व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ झाला.
वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असून, भविष्यातही समाजहितासाठी विविध सेवाभावी उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे दयानंद चोरघे यांनी सांगितले.
चिमुकल्यांकडून वारकरी संस्कृतीचे दर्शन
आषाढी एकादशीनिमित्त अंकुरम प्री स्कूलमध्येही भक्तिमय वातावरणात उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, वारकरी तसेच संतांच्या वेशभूषा साकारत वारकरी संस्कृतीचे आकर्षक दर्शन घडविले. शिक्षिकांनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
वारकऱ्यांसाठी केळींचे वाटप
पनवेल : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या वतीने तब्बल ५० हजार केळींचे मोफत वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
'प्रतिपंढरपूर' बिर्ला मंदिरात विठ्ठलनामाचा गजर
कल्याण : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शहाड येथील श्री विठोबा-रुक्मिणी मंदिरात गावठाण तसेच परिसरातील भजन मंडळांनी सादर केलेल्या भजन, कीर्तन आणि नामस्मरणामुळे मंदिर परिसरासह संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. या निमित्ताने कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट, सेंच्युरी रेयॉन, बी. के. बिर्ला
महाविद्यालय, बी. के. बिर्ला रात्र महाविद्यालय, बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सरला बिर्ला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ज्ञानदिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रकृती संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणारी तसेच भगवान श्री विठोबा रुक्मिणी यांच्या भक्तीवर आधारित ही ज्ञानदिंडी बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघून शहाड येथील श्री विठोबा-रुक्मिणी मंदिरात पोहोचली.
कार्यक्रमादरम्यान स्थानिक व्यावसायिक, समाजसेवक तसेच धार्मिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांमध्ये सक्रिय असलेले प्रमुख पाहुणे महेश अग्रवाल यांनी सपत्नीक, तसेच कल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त ओ. आर. चितलांगे, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी आणि उद्धव रूपचंदानी यांनी सपत्नीक भगवान श्री विठोबा-रुक्मिणी यांची विधिवत पूजा-अर्चना करून आशीर्वाद घेतला. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भगवान श्री विठोबा-रुक्मिणी यांची पूजा-अर्चना केली.