नव्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता

मुळातच मंत्रिपदाच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याला आघाडीच्या कार्यकाळात विशेष अशी संधी मिळालेली नाही
नव्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असल्यामुळे नव्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रीमंडळात शिंदे यांच्यासह गणेश नाईक, प्रताप सरनाईक, रवींद्र चव्हाण आणि किसन कथोरे यांच्या नावाची चर्चा असून काही दिवसांपूर्वी ठाण्यात येऊन देवेंद्र फडणवीस यांनी ज्या संजय केळकर यांच्या कामाची तोंडभरून स्तुती केली होती त्या केळकर यांना यंदा तरी,मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? याकडे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मुळातच मंत्रिपदाच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याला आघाडीच्या कार्यकाळात विशेष अशी संधी मिळालेली नाही. एखादे कॅबीनेट मंत्रिपद वा एखादे राज्यमंत्रीपद मिळण्याव्यतिरीक्त या जिल्ह्याच्या पदरी यापूर्वी काही विशेष आलेले नाही. नाही म्हणायला शिवसेना भाजपा युतीच्या १९९५ च्या सरकारमधे नवी मुंबईचे गणेश नाईक,अंबरनाथचे साबीर शेख, डोंबिवलीचे जगन्नाथ पाटील आणि काही काळ विक्रमगडचे विष्णू सावरा या चार दिग्गजांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली होती. परंतू त्यानंतरच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या पहिल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकमेव गणेश नाईक यांना कॅबीनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाले होते. तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होताच राजेंद्र गावित या पालघरच्या एकमेव कॉंग्रेस आमदाराला राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. तर आघाडी सरकारचा अवघा चार महिन्याच्या कार्यकाळ शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे त्यांच्या रुपाने ठाणे शहराला पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर २०१४ च्या भाजप शिवसेना सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आणि कोपरी पाचपाखाडीचे आमदार एकनाथ शिंदे यांचा कॅबिनेटमंत्री म्हणून शपथविधी झाला होता आणि त्यानंतर डोंबिवलीच्या रवींद्र चव्हाण यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती.

दरम्यान अडीज वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच पार पडला होता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा त्यांनाच मिळाले तर मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आता नव्या सरकारमध्ये शिंदे, गणेश नाईक, प्रताप सरनाईक, रवींद्र चव्हाण , किसन कथोरे यांच्या नावाची चर्चा असली तरी पालकमंत्रिपद प्रताप सरनाईक , संजय केळकर की गणेश नाईक यांना मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in