लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ठाणे जिल्ह्यात ६५ लाख १ हजार ६७१ एकूण मतदार, मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर

देशाच्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तब्बल ४४ दिवस चालणाऱ्या या रणधुमाळीचा अंतिम निकाल चार जून रोजी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ठाणे जिल्ह्यात ६५ लाख १ हजार ६७१ एकूण मतदार, मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर

ठाणे/भाईंंदर/उरण/मुरूड/डोंबिवली : देशाच्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तब्बल ४४ दिवस चालणाऱ्या या रणधुमाळीचा अंतिम निकाल चार जून रोजी लागणार आहे. देशात सात टप्प्यांमध्ये निवडणूक संपन्न होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यामुळे प्रशासन, मतदार आणि राजकीय पक्ष कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोइंगचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. प्रशासन आणि पोलीस निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजन करत असल्याचे सध्या चित्र आहे. यंदाची लोकसभा ही महत्त्वाची मानली जात असल्यामुळे प्रशासन, मतदार आणि राजकीय पक्ष सज्ज झाले असून यंदाच्या रणधुमाळीत कोण बाजी मारेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी ४२ हजार अतिरिक्त पोलीस कर्मचारी लागणार असून १८ मतदान केंद्रावर महिला कर्मचारीच कार्यरत असणार आहेत. तसेच जिल्ह्यात ६५ लाख १ हजार ६७१ एकूण मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले. मतदान २० मे रोजी होणार असून मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. एकूण आवश्यक ईव्हीएमची संख्या १५ हजार ८२१ आहे. टपाली मतदारपत्रिका देखील देण्यात येणार आहे. तसेच निवडणूक विषयक cvigil, voter help line, saksham app, suvidha app, encore app ची मदत देखील उमेदवारांना तसेच नागरिकांना होणार आहे. मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराला ७५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. ६० भरारी निवडणूक पथक नेमण्यात आले आहेत. २३ एप्रिल पर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांना मतदान यादीत नाव नोंदणी करता येणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्टीवर निर्बंध

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कामाला लागले असून शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या सुट्टीवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात किमान साठ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना मतमोजणी होईपर्यंत सुट्टी देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. त्याकरिता किमान साठ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर जबाबदारी असणार आहे. जिल्ह्यातील राज्य, केंद्र, निमसरकारी, महामंडळ, अनुदानित तसेच विना अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक आणि बँक कर्मचाऱ्यांना दीर्घ मुदतीची सुट्टी देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज असल्याने सर्व आस्थापना प्रमुखांनी याची नोद घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. मतदानाचे साहित्य वाटप देखील मतदानाच्या आधी होणार असून शिक्षक यांना तीन दिवसांची सुट्टीच्या दिवशीच मतदानाची ट्रेनिंग देण्यात येत आहे. यामुळे शिक्षक देखील मतदान केंद्रावर आपले कर्तव्य पार पडणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, तहसीलदार प्रदीप कुडळ, तहसीलदार उज्वला भगत आदी उपस्थित होते.

कल्याणमध्ये ७५ टक्के मतदान होणे अपेक्षित

कल्याण लोकसभा मतदार संघात २० मे रोजी निवडणुका होणार आहे अशी माहिती कल्याण लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय कार्यकारी अधिकारी सुषमा सातपुते यांनी डोंबिवलीत दिली. कल्याण लोकसभा मतदार संघ मिळून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व - पश्चिम, डोंबिवली ,कळवा, मुंब्रा असे सहा मतदार संघ आहेत. यामध्ये २०,१८,९५८ मतदार असून यामध्ये तृतीयपंथी ७३८, दिव्यांग १०,८०२, नवमतदार २२,१७९ आहेत. कल्याण लोकसभा क्षेत्रात १९५५ मतदान केंद्र आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्या बरोबरच मतदानाचे टक्केवारी वाढावी यासाठी नागरिकांनी मतदानासाठी यावे असे आवाहन सातपुते यांनी केले. यंदा त्यामुळे ७५ टक्के मतदान होणे आयोगाला अपेक्षित आहे.

मीरा-भाईंदरमध्ये तयारी पूर्ण

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाची लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती अप्पर तहसीलदार निलेश गौंड यांच्या आदेशानुसार निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांनी दिली आहे. यावर्षी लोकसभा निवडणुकीत मीरा-भाईंदर विधानसभेत १७ हजार १० नवीन मतदारांची वाढ झाली आहे.

आतापर्यंत सात हजार १०९ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यावर्षी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात ४ लाख ३९ हजार २८३ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या २ लाख ३३ हजार २८३, तर महिला मतदारांची संख्या २ लाख पाच हजार ६२५ असून चार तृतीयपंथी मतदार आहेत. निवडणूक प्रशासनाने निवडणुकीसाठी ७४ ठिकाणी मतदान केंद्राची उभारणी केली आहे. त्यामध्ये ४५१ मतदान बूथ असणार आहेत. यामध्ये शाळा, सभागृह व मंडप यांचा समावेश असून यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार सर्व मतदान बूथ हे तळमजल्यावरच असणार आहेत. मीरारोड येथील रॉयल कॉलेजमध्ये या मतदान यंत्रांचे वाटप व स्वीकृती करण्यासाठी स्ट्रॉंगरूम तयार करण्यात आले आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढेल, अशी आशा प्रदीप मुकणे, निवडणूक नायब तहसीलदार यांनी व्यक्त केली आहे.

वयोवृद्ध मतदारांचा टक्का वाढण्यावर जोर

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघांतर्गत वयोवृद्ध मतदारांची एकूण संख्या ही ३ हजार १६८ एवढी असून यापैकी वय वर्षे १०० ते १०९ मध्ये ३ हजार १३३, तर ११० ते ११९ वयोगटात २० आणि १२० वयोमान पार केलेल्या मतदारांची संख्या १५ इतकी आहे. यामध्ये शंभरी पार एकूण पुरुष मतदार एक हजार ६६२ तर एक हजार ५०६ महिला मतदार आपला मतदानाचा हक्क घरून बजावणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे. आतापर्यंत १ लाख ७७ हजार अर्जांचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले.

या अधिकाऱ्यांवर जबाबदारी

भिवंडी २३ या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी नवी मुंबई, कल्याण -२४ या ठिकाणी सुषमा सातपुते, अतिरिक्त अभियान संचालक, सिडको भवन, ठाणे २५ या ठिकाणी मनीषा जायभाये- धुळे हे पाहणार आहेत. तसेच उमेदवाराला कुणी नागरिकांनी १० रुपये तरी दिले तरी त्याची परवानगी घेऊनच द्यावे लागणार आहेत, अन्यथा त्याची तक्रार कुणी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली तर त्यावर कारवाई होणार आहे.

पक्षावर भरारी पथकाची नजर

रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत १९२ अलिबाग विधानसभा मतदारसंघात निवडणूक ०७ मे २०२४ रोजी संपन्न होणार आहे. कुठेही आचारसंहिता भंग होऊ नये व निवडणूक शांततेत व सुरळीत व्हावी या दृष्टीने जिल्हाधिकारी रायगड अलिबाग व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अलिबाग यांनी भरारी पथक, आचारसंहिता पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथकांची नेमणूक केली आहे.त्या अनुषंगाने भरारी पथक मुरूड तालुक्यात २४ तास गस्त घालत आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारावरांच्या हालचालींवर व त्याच्या कार्यकर्त्यांवर

तसेच वाहतूक करणाऱ्यांवर भरारी पथकाची करडी नजर आसणार आहे. यावेळी भरारी पथकाचे प्रमुख-अमोल दोंदे, किरण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक- अतुल मडके, नथुराम रोहेकर,प्रकाश आरेकर, दत्ताराम नाईक, पोलीस शिपाई- मनोज हंबीर, पोलीस शिपाई-खेळु बांगारे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहिता

उरण मतदारसंघात आचारसंहिता भंग होणार नाही, याबाबत पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. मावळ मतदारसंघात १३ मे रोजी निवडणूक होणार आहे. मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि खालापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. या तीनही मतदारसंघात आदर्श आचारसंहिता राबविण्यास सुरुवात केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितले. आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीने तीनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन अशा सहा भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तीनही मतदारसंघातील राजकीय पक्षांचे जाहिरातींचे बॅनर्स, होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत.

एकूण मतदान केंद्र

जिल्ह्यात ६ हजार ५९२

सर्वाधिक कमी मतदान केंद्र उल्हासनगर २५१

सर्वाधिक जास्त मतदान केंद्र मुरबाड ५११

महिला मतदान केंद्र २२

संवेदनशील मतदान केंद्र ६

युवा मतदान केंद्र १

दिव्यांग मतदान केंद्र १८

logo
marathi.freepressjournal.in