Thane : शहरात धुराचे साम्राज्य! डम्पिंग ग्राऊंडचा धूर घराघरांत; आरोग्याशी खेळ, आंदोलनाचा इशारा

दिव्यातील डम्पिंग ग्राऊंडवर साचलेल्या कचऱ्याला वारंवार आग लागत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा जळल्यानंतर निर्माण होणारा विषारी धूर निवासी वस्त्यांमध्ये पसरत असून, नागरिकांना दुर्गंधी आणि प्रदूषित हवेत राहावे लागत आहे.
Thane : शहरात धुराचे साम्राज्य! डम्पिंग ग्राऊंडचा धूर घराघरांत; आरोग्याशी खेळ, आंदोलनाचा इशारा
Thane : शहरात धुराचे साम्राज्य! डम्पिंग ग्राऊंडचा धूर घराघरांत; आरोग्याशी खेळ, आंदोलनाचा इशाराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

ठाणे : दिव्यातील डम्पिंग ग्राऊंडवर साचलेल्या कचऱ्याला वारंवार आग लागत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा जळल्यानंतर निर्माण होणारा विषारी धूर निवासी वस्त्यांमध्ये पसरत असून, नागरिकांना दुर्गंधी आणि प्रदूषित हवेत राहावे लागत आहे. वर्षानुवर्षे कायम असलेल्या या समस्येवर ठाणे महापालिकेला अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवेकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा जळल्याने निर्माण होणाऱ्या धुराचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. डोळ्यांची जळजळ, खोकला, दम लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होण्याच्या तक्रारींची शक्यता वाढली आहे. एकीकडे दिवा शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना दुसरीकडे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.

शहराच्या विकासाच्या घोषणा करणाऱ्या महापालिका प्रशासनाला दिवेकरांच्या आरोग्याची चिंता आहे की नाही, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला आहे. डम्पिंग ग्राऊंडवर वारंवार आगीच्या घटना घडत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उपाययोजनांची मागणी

डम्पिंग ग्राऊंडवरील आग तातडीने विझवावी, कचरा जाळला जाणार नाही यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, परिसरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि नागरिकांचे वैद्यकीय सर्वेक्षण करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची निश्चिती करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.दिवेकरांना विकास हवा आहे; मात्र विकासाच्या नावाखाली विषारी धूर श्वासात घेण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये. महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करून ही समस्या सोडवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ॲड. मुंडे यांनी दिला आहे.

अग्निशमन दलाची अहोरात्र झुंज

उल्हासनगर : उल्हासनगरच्या गायकवाड पाडा येथील डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग चार दिवस उलटूनही पूर्णपणे विझलेली नाही. दिवाळीच्या दिवशी, रविवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास लागलेली ही आग बुधवारीही धुमसत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत असल्याने परिसरात धुराचे साम्राज्य कायम आहे. अग्निशमन दलाकडून सातत्याने पाण्याचा मारा केला जात असून, आग पुन्हा भडकू नये यासाठी २४ तास पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र नागरिकांची धुराच्या त्रासातून अद्याप सुटका झालेली नाही.

डम्पिंग ग्राऊंडमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. धुराचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांना घरांची खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावे लागत आहेत. चार दिवसांपासून अग्निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये धुमसणारी आग पूर्णपणे विझविण्यात अडचणी येत आहेत. या डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आली असतानाही येथे कचरा साठविला जात असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार लागणाऱ्या आगी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.दरम्यान, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तीन शहरांसाठी बदलापूर येथे संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत नागरिकांनी धूर आणि दुर्गंधीचा त्रास सहन करायचा का, असा सवाल उपस्थित होत आहे.महापौर ॲड. अश्विनी निकम आणि महापालिका प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून आग पूर्णपणे विझवावी. तसेच डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)