Thane : भटक्या कुत्र्यांची दहशत; उपचारापेक्षा वेदना भयंकर

ठाणे शहरातील दिवा परिसरात भटक्या कुत्र्याने मागून केलेल्या हल्ल्यात दोन वर्षांची बालिका गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे दिव्यातील रहिवासी तीव्र भीतीच्या छायेत आहेत. दिवा उपनगरात घडलेली ही घटना ठाण्यातील इतर भागातही घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भटक्या कुत्र्यांची दहशत; उपचारापेक्षा वेदना भयंकर
भटक्या कुत्र्यांची दहशत; उपचारापेक्षा वेदना भयंकर
Published on

ठाणे दर्पण

अतुल जाधव

ठाणे शहरातील दिवा परिसरात भटक्या कुत्र्याने मागून केलेल्या हल्ल्यात दोन वर्षांची बालिका गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे दिव्यातील रहिवासी तीव्र भीतीच्या छायेत आहेत. दिवा उपनगरात घडलेली ही घटना ठाण्यातील इतर भागातही घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. झोपडपट्टी असो किंवा आलिशान गृहसंकुल, भटक्या कुत्र्यांचा वावर दोन्ही ठिकाणी वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

मागील काही दिवसांचा आढावा घेतला असता, लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढत असल्याचे आढळून येते. दिव्यातील घटनेपूर्वी टिटवाळा परिसरातही एका बालिकेला भटक्या कुत्र्याने लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे, हे हल्ले दिवसा किंवा रात्री केव्हाही होत असून, अचानक चार ते पाच कुत्रे एकत्र येऊन झुंडीने हल्ला करतात. दुचाकी-चारचाकींच्या मागे लागणे, अंगावर धावून येणे, चावा घेणे अशा घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

मागील वर्षी रेबीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत ७,४०९ भटक्या कुत्र्यांना लसीकरण करण्यात आले होते. रस्त्यावर उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ, चायनीज स्टॉल, हॉटेल्स आणि धाब्यांमध्ये रात्री उरणारे अन्न पदार्थ रस्त्यावर टाकले जातात. या उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या खाद्य अवशेषांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार करणाऱ्या भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणांहून भटके कुत्रे हटवून त्यांचे निर्बीजकरण व लसीकरण करून त्यांना प्राणी निवारा गृहातच ठेवावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र तात्काळ अंमलबजावणी करणे अनेक शहरांसाठी आव्हानात्मक आहे, कारण पर्याप्त प्राणी निवारागृहे उपलब्ध नाहीत. रात्रीच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी नागरिक कुत्र्यांना अन्न देत असतात; परंतु त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी कायद्याचा आधार घेणेही आवश्यक ठरेल. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणार का, हा एक गंभीर प्रश्न आहे.

उत्पत्तीवर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक

ठाणे शहरात वागळे इस्टेट येथे महापालिकेचे भटक्या कुत्र्यांसाठी एकमेव निवारा केंद्र आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत असल्याने अतिरिक्त निवारा केंद्रांची तातडीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पशुवैद्य आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होणार आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. निर्बीजीकरणाचा वेग वाढवून जन्मदर कमी करणे, तसेच नागरिकांमध्ये अन्नदान करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल योग्य जनजागृती करणे गरजेचे आहे.

दोन वर्षांपासून निर्बीजीकरणाला सुरुवात

ठाणे महापालिका हद्दीत २००४ ते २०१९ या कालावधीत सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून ५८ हजार ५३७ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षे ही प्रक्रिया थांबवण्यात आली. मात्र मागील दोन वर्षांपासून निर्बीजीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. २०२३ मध्ये ८,००६ आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान ४,३०५ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in