

ठाणे : ठाणे शहरात दिवाळीच्या आठ दिवसांत शहरातील विविध आग भागांत ३० ठिकाणी लागल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ६ ते ८ नोव्हेंबर या तीन दिवसांत १८ ठिकाणी आग लागली, तर ८ नोव्हेंबरला एकाच दिवशी आठ घटनांची नोंद झाली. फटाक्यांच्या ठिणग्या आणि विद्युत रोषणाईतील तांत्रिक बिघाडामुळे या घटना घडल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दिवाळीनिमित्त घरे, दुकाने आणि निवासी संकुलांमध्ये आकर्षक रोषणाई केली जाते. गॅलरी, खिडक्या, दरवाजे तसेच इमारतींच्या बाहेरील भागात विद्युत दिव्यांच्या माळा लावल्या जातात. दुसरीकडे फटाक्यांची आतषबाजी आणि आकाशात सोडण्यात येणाऱ्या रॉकेटमुळे आगीचा धोका वाढतो. फटाक्यांची ठिणगी सजावटीचे साहित्य, पडदे, गॅलरीतील वस्तू किंवा इमारतींच्या परिसरातील कचऱ्यावर पडल्यास आग भडकण्याची शक्यता असते.
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या आकडेवारीनुसार, १ नोव्हेंबरला आगीची एक घटना घडली. २ नोव्हेंबरला तीन, ३ नोव्हेंबरला एक, ४ नोव्हेंबरला चार, तर ५ नोव्हेंबरला तीन घटनांची नोंद झाली. त्यानंतर ६ नोव्हेंबरला सहा, ७ नोव्हेंबरला चार आणि ८ नोव्हेंबरला आठ ठिकाणी आग लागली.
शेवटच्या तीन दिवसांत सर्वाधिक धावपळ
दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या तुलनेत शेवटच्या तीन दिवसांत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान १८ घटना घडल्या. म्हणजेच आठ दिवसांतील एकूण घटनांपैकी ६० टक्के घटना या तीन दिवसांत घडल्या आहेत. विशेषतः ८ नोव्हेंबरला एकाच दिवशी आठ ठिकाणी आग लागल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची धावपळ उडाली.