

ठाणे : दिवाळीच्या शुभेच्छापत्रासोबत मिठाई किंवा भेटवस्तू देण्याची प्रथा सर्वत्र आहे. मात्र, या प्रथेला सामाजिक बांधिलकीची जोड देत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यंदा गोसेवेचा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या दिवाळी शुभेच्छापत्रासोबत नागरिकांच्या वतीने गोमातेसाठी ११ किलो चारा अर्पण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या चाऱ्याचे मूल्य आधीच अदा करण्यात आले असून, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चारा वितरणाची माहिती आणि छायाचित्रेही नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील काही भागांत अपुऱ्या पावसामुळे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोशाळांमधील गायींना चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आमदार केळकर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. अनेकांना गोसेवेची इच्छा असते; मात्र वेळेअभावी गोशाळेत जाऊन प्रत्यक्ष सेवा करणे शक्य होत नाही. यासाठी विशेष प्रीपेड गोसेवा गिफ्ट कार्ड तयार करण्यात आले असून, त्यावर क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर गोसेवेविषयीची माहिती मिळणार आहे. त्यानंतर ताजा आणि पौष्टिक चारा नोंदणीकृत गोशाळांमधील गायींपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. चारा वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित गोशाळेचे नाव, चारा पोहोचल्याची छायाचित्रे आणि लोकेशनसह सविस्तर माहिती लाभार्थ्यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येणार आहे. ही माहिती नागरिकांना आपल्या सोसायटी तसेच विविध संस्थांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरही शेअर करता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा या उपक्रमाला पाठिंबा मिळाला आहे. दिवाळीच्या आनंदात सामाजिक आणि प्राणीसेवेची भावना जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे विशेष शुभेच्छापत्र देण्यात आले आहे.
संजय केळकर, आमदार
‘गोग्रास’ ॲपद्वारे गोशाळांना चारा
दिवाळीच्या शुभेच्छांसोबत गोमातेसाठी चाऱ्याची भेट देण्याचा अनोखा उपक्रम महाजप संस्थेने राबविला आहे. ‘गोग्रास’ या विशेष ॲपच्या माध्यमातून डिजिटल शुभेच्छापत्रासोबत गोशाळांना चारा देण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आमदार संजय केळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेचे डिजिटल तज्ज्ञ पुरुषोत्तम पासपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ॲप विकसित करण्यात आले आहे. डिजिटल शुभेच्छापत्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर सुमारे ३० सेकंदांचा शुभेच्छा संदेश पाहता येतो. त्यानंतर नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवून गोमातेसाठी ठराविक किलो चारा भेट देण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे पाच हजार नागरिकांना डिजिटल शुभेच्छापत्र पाठविण्यात आले असून, जवळपास ३५० गोशाळा सहभागी झाल्या आहेत. दिवाळीचा आनंद सामाजिक बांधिलकीशी जोडणारी ही संकल्पना कौतुकास्पद असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोसेवेला लोकसहभागाची जोड देण्याचा महाजप संस्थेचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे.