ठाणे: शहरातील डबलडेकरचे मार्ग निश्चित, विद्यार्थी आणि ज्येष्ठांना खास सवलत; ‘हे’ आहेत तीन मार्ग

मुंबईप्रमाणे ठाण्यातही डबलडेकर बस धावणार असल्याचे स्वप्न मागील काही दिवसांपासून ठाणेकरांना दाखविले जात आहे.
ठाणे: शहरातील डबलडेकरचे मार्ग निश्चित, विद्यार्थी आणि ज्येष्ठांना खास सवलत; ‘हे’ आहेत तीन मार्ग

प्रतिनिधी/ठाणे : मुंबईप्रमाणे ठाण्यातही डबलडेकर बस धावणार असल्याचे स्वप्न मागील काही दिवसांपासून ठाणेकरांना दाखविले जात आहे. आता कुठे ते प्रत्यक्षात उतरणार असल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. त्यानुसार परिवहनच्या अर्थसंकल्पातही या बसचा उल्लेख करण्यात आला आहे. ठाण्यातील डबलडेकरचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. परिवहनच्या ताफ्यात येणाऱ्या या बसचे प्रस्तावित मार्ग कोणते असतील, त्याचा शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना कसा फायदा होईल याचा देखील अभ्यास आता जवळ जवळ झाला आहे. पहिल्या टप्प्यात तीन बस घेण्याचे प्रस्तावित असून, त्याचे तीन मार्गही सभापती विलास जोशी यांनी निश्चित केले आहेत.

ठाणे परिवहनच्या ताफ्यात १२३ इलेक्ट्रिक बसपैकी ११४ बस ताफ्यात दाखल झाल्या असून उर्वरित बस या २०२४ अखेर दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात ४४६ बस असून आगामी काळात पीएम ई-बससेवा योजनेअंतर्गत १०० व एनसीएपी अंतर्गत १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत ८६ पुढील आर्थिक वर्षात दाखल होणे अपेक्षित आहे. तसेच जेएनएनयूआरएमअंतर्गत प्राप्त झालेल्या १९० आणि ५० महिलांकरिता तेजस्विनी बस व १२३ इलेक्ट्रिक बस अशा मिळून ३६३ बस ठाणेकर नागरिकांना सेवा देत आहेत. आगामी दोन वर्षांत १८६ इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. त्यात आता नव्याने डबलडेकर बसचे स्वप्न देखील परिवहनने ठाणेकरांना दाखविले आहे. सध्या इलेक्ट्रिक बसमुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होत आहे. त्यात आता येत्या काळात डबलडेकर बसचा देखील समावेश होणार आहे.

नुकत्याच झालेल्या परिवहनच्या अर्थसंकल्पात डबलडेकर बसचा ओझरता उल्लेख करण्यात आला आहे. परंतु त्यांची संख्या किती असणार, त्या केव्हा येणार याचा उल्लेख दिसून आला नाही. परंतु आता परिवहनच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात तीन डबलडेकर बस समाविष्ट होतील, अशी माहिती परिवहन सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतीत ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली. वर्षभराच्या आत त्या बस परिवहनच्या ताफ्यात दाखल करण्याचे प्रयोजन आहे. मागील काही महिन्यांपासून ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच सेंट्रल पार्क, चौपाटी, आदींसह काही ऐतिहासिक मंदिरांचा वारसा देखील ठाण्याला लाभला आहे. त्यामुळे बदलते ठाणे ठाणेकरांना डबलडेकर बसमधून पाहता यावे याचे प्रयोजन आखण्यात आले आहे. त्यानुसार यासाठी विलास जोशी यांनी तीन मार्ग निश्चित केले आहेत.

‘हे’ आहेत तीन मार्ग

तीन हात नाका ते थेट घोडबंदर गायमुख हा पहिला मार्ग, दुसरा मार्ग शिळफाटा दत्त मंदिर ते डोंबिवलीचा एन्ट्री पॉइंट आणि तिसरा मार्ग पारसिक नगर मुंब्रा वळण रस्ता ते कळवा शिवाजी नगर हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या तीनही मार्गांत डबलडेकर बसला कुठेही अडथळा नसल्याचे अभ्यास दिसून आले आहे. त्यामुळे पहिल्या तीन बस या मार्गावर सोडण्याचे प्रयोजन आहे.

विद्यार्थी आणि ज्येष्ठांना खास सवलत

शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठांना यातून सवलतीच्या दरात प्रवास करण्याची संधी देण्याचे प्रयोजन आहे. त्यानुसार शनिवार आणि रविवारी एकाच तिकिटात तीन मार्गांवर त्यांना डबलडेकर बसमध्ये बसून फिरण्याची संधी देण्याचे प्रयोजन आखण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in