डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण एनओसीमुळे लटकले

ठाण्यात २००६ वर्षापासून आंबेडकर भवनाची फरफट सुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण एनओसीमुळे लटकले

ठाणे जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्याचे काम गेल्या १७ वर्षापासून सुरू आहे. मात्र या भवनाची फरफट काही थांबताना दिसत नाही. विशेष म्हणजे, सर्व काम पूर्ण झाले आहे, रंगरंगोटी करण्यात आली आहे. पालिकेकडे एनओसी मिळावी यासाठी सहा महिन्यांपूर्वी अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे किमान आज, आंबेडकर जयंतीला या भवनाचे लोकार्पण होईल, अशी शक्यता होती; मात्र ती शक्यता आता मावळली आहे.

महाराष्ट्र शासनाची सर्व कार्यालये एकाच इमारतीत असावित. त्यामुळे अनुसूचित जातीजमाती आणि इतर मागासवर्ग आदी लाभार्थ्यांना त्याचा चांगला उपयोग होवू शकतो, सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होवू शकते. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन उभारण्याची योजना तत्कालीन कॉँग्रेस, राष्ट्रवादी राज्यसरकारने हाती घेतली होती. या योजनेअंतर्गत २००६-२००७ या वर्षात निधी ठाण्याच्या विशेष जिल्हा समाजकल्याण कार्यालयास मंजूर केला होता. अगदी सुरवातीला या भवनासाठी सामाजिक न्याय विभागाने ४ एकर जागेची मागणी कलेक्टर कार्यालयाकडे केली होती; मात्र कोपरी येथील रेल्वेलगतची फक्त १६ गुंठे जागाच मंजूर करण्यात आली.

१५ फेब्रुवारी २००७ रोजी या जागेचा ताबा समाजकल्याण विभागाने घेतला. काम सुरू करण्यासाठी २७ डिसेंबर२००९ रोजी कर्मचारी गेले असता, ही जागा आमची असल्याचे सांगत रेल्वेने काम थांबवले. त्यानंतर कळवा येथील पाटबंधारे कार्यालयालगत असलेल्या शासकीय जमिनीपैकी सहा एकर जागा या भवनासाठी मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला. त्यापैकी १० हजार चौ. मिटर जागा भवनासाठी सुमारे पाच वर्षांनी भवनासाठी मिळाली. या जमिनीचा ताबा १ डिसेंबर २०१२ रोजी विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांना मिळाला. मोकळ्या जागेला बाजूच्या हौसिंग सोसायट्या तसेच महापालिकेचा नाले विभाग अशा चार भिंतींनी अतिक्रमण केले असल्याने मंजूर जागेपैकी बराच भाग अतिक्रमित झाला होता. चार मजली इमारतीचे नकाशे ६ जानेवारी २०१४ रोजी मंजुरीसाठी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठवण्यात आले; मात्र पालिकेची मंजुरी मिळायलाही बराच उशीर झाला.

बहुतांशी कामे पूर्ण

दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून फायर एनओसी मिळवण्यासाठी यंत्रणा बसवण्यात येत आहे. तसेच बेसमेंट , अंतगर्त रस्ते, पार्किंग, इलेक्ट्रिकची कामे, संरक्षक भिंत, फर्निचर, अग्निशमन यंत्रणा आदी कामे पूर्ण आल्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी यांनी दै. नवशक्तिला सांगितले.

भवनासाठी अडथळ्यांची शर्यत

१ . मोकळ्या जागेला बाजूच्या हौसिंग सोसायट्या तसेच महापालिकेचा नाले विभाग अशा चार भिंतींनी अतिक्रमण केले असल्याने मंजूर जागेपैकी बराच भाग अतिक्रमित झाला आहे.

२. चार मजली इमारतीचे नकाशे ६ जानेवारी २०१४ रोजी मंजुरीसाठी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठवण्यात आले मंजुरी मिळण्यास बराच विलंब झाला.

३. ६ जून २०१४ रोजी बांधकामाची वर्कऑर्डर निघाली आणि श्री एम. देवांग या ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामाचा ठेका देण्यात आला.

४. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी ५ जानेवारी २०१५ रोजी प्रस्ताव देण्यात आला होता; मात्र ही मंजुरी मिळण्यासही दोन वर्षाहून अधिक कालावधी जावा लागला.

५. सप्टेंबर २०२१ मध्ये संरक्षक भिंत बांधताना स्थानिक नागरिकांनी केला विरोध. भवनाच्या जागेत काही जागा आमची असल्याचा नागरिकांचा दावा.

६. पालिकेची एनओसी मिळवण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी केलाय अर्ज

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in