Thane : दुष्काळाचे सावट पिकांवर; भातशेतीसह 'नाचणी-वरी' पिके धोक्यात

ठाणे जिल्ह्यात पावसाने वेळेआधीच उघडीप दिल्याने भातशेतीसह नाचणी आणि वरी पिके धोक्यात आली आहेत.
Thane : दुष्काळाचे सावट पिकांवर; भातशेतीसह 'नाचणी-वरी' पिके धोक्यात
Thane : दुष्काळाचे सावट पिकांवर; भातशेतीसह 'नाचणी-वरी' पिके धोक्यातप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

बदलापूर : ठाणे जिल्ह्यात पावसाने वेळेआधीच उघडीप दिल्याने भातशेतीसह नाचणी आणि वरी पिके धोक्यात आली आहेत. खरीप हंगामातील पिकांचे संभाव्य नुकसान लक्षात घेता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामात भाताची लागवड करतात. याशिवाय नाचणी आणि वरी ही पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यंदा पावसाचे आगमन सुमारे महिनाभर उशिराने झाल्याने पेरण्या आणि लागवडीचे नियोजन कोलमडले.

मात्र, प्राथमिक अंदाजानुसार, एकूण लागवडीपैकी निम्म्या क्षेत्रातील भातपिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट गडद झाले असून, पावसाच्या खंडामुळे भातशेतीसह अन्य पिकांच्या नुकसानीची भीती वाढली आहे. ठाणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. रायगडमधील अलिबाग, मुरुड, रोहा, पेण आणि सुधागड-पाली या पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शासनाकडे मागणी केली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार आणि तलासरी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक नुकसानीचे पंचनामे आणि दुष्काळी सवलती मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कडधान्य आणि भाजीपाल्यालाही फटका

जिल्ह्यात सुमारे ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात आणि भाजीपाला पिकांची लागवड होते. यंदा जमिनीतील ओलावा कमी झाल्याने तसेच विहिरी आणि कूपनलिकांमधील पाण्याची पातळी घटल्याने आगामी कडधान्य आणि भाजीपाला लागवडीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी कथोरे यांनी केली आहे. त्यांच्या निवेदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in