
ठाणे : अनधिकृत शाळेत शिक्षण घेत असलेल्या सतरा हजार विद्यार्थ्यांचे खासगी शाळेत समायोजन करण्याबाबत शिक्षण विभाग प्रयत्नशील असून त्या दृष्टीने आवश्यक त्या हालचाली करण्यात येत आहेत. अनधिकृत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने सदर निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय या विद्यार्थ्यांकडून प्रवेश देत असतांना अधिकृत शाळांनी वाढीव फी आकारू नये, यासाठी देखील विनंती केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने महापालिकेने या शाळांच्या विरोधातील मोहीम थांबविली होती.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिृकत शाळांच्या स्थितीचा आढावा घेतला होता. यामध्ये शाळांची नोंदणी नाही, काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहेत. काही अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी दिली. या सर्व अनधिकृत शाळांची यादी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त शाळांची संख्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आहेत. त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समितीने या अनधिकृत शाळांविरुद्ध कार्यवाही सुरू केलेली आहे.
या शाळांमध्ये १८ ते १९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचे आगामी वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने आता शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार त्या शाळा ज्या ज्या भागात आहेत, त्या भागातील अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी तसेच या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षात १५ हजार विद्यार्थ्यांचे समायोजन केले जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांकडून वाढीव फी आकारली जाऊ नये, यासाठी देखील विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना नजिकच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजित करण्याचाही विचार केला जात आहे. त्यास १९ खासगी शाळांनी तयारी दाखवली असल्याचे सांगळे यांनी स्पष्ट केले.