
मी मुख्यमंत्री झाल्यापासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात ८५० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली आणि त्यातील ४०० कोटींचा फंड रिलीज देखील झाला आहे. सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक अशी विकासकामे आणि मंजुऱ्या या ओवळा माजिवडा मतदारसंघासाठी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या आहेत. जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईला सुशोभित सुंदर व खड्डेमुक्त करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याच धर्तीवर ठाणे सुद्धा खड्डेमुक्त करतोय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सध्या लहान मुलांना उन्हाळी शाळांना सुट्टी असून, अनेक मुले घरात बसून कंटाळतात. या मुलांना विरंगुळा, खेळ आणि त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी एखादे व्यासपीठ मिळावे म्हणून युवा सेनेचे नेते पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून घोडबंदर येथे 'समर वंडरलँड' हे चार दिवसीय फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या फेस्टिव्हलचा समारोप झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.
शाळेची परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी लागली की पूर्वी गावी जाऊन मस्त मजा मस्ती केली जायची, मात्र काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आता उन्हाळी सुट्टी लागल्यावर नक्की काय करावे ते मुलांना आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांनाही सुचत नाही. त्यामुळेच या छोट्या दोस्तांना आवडतील, रुचतील, करायला मौज वाटेल असे अनेक उपक्रम, खेळ आणि स्टॉल्स याठिकाणी ठेवण्यात आले होते. या उपक्रमांना छोट्या दोस्तांनी त्यांच्या पालकांसह दिलेला प्रतिसाद पाहता दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करावे अशी अपेक्षा याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली व हजारो लोकांचा प्रतिसाद लाभलेल्या या 'समर वंडरलँड'चे आयोजक पूर्वेश सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले. दरवर्षी घोडबंदर भागात व मीरा भाईंदर शहरात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल , असेही जाहीर करण्यात आले. छोट्या मुलांमध्ये मोबाईल मधून बाहेर पडून अनेक छान छान गोष्टी करण्याची इच्छा असते; मात्र त्यासाठी काहीतरी निमित्त लागते ते निमित्त पूर्वेश सरनाईक यांनी या भव्य फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळवून दिल्याबद्दल त्यांचे शिंदे यांनी विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजवर प्रताप सरनाईक हे बहुतेक उपक्रम उपवनला करत होते. पण आता हा भव्य दिव्य असा पहिला कार्यक्रम घोडबंदर येथेही झाला आणि घोडबंदरवासियांना या 'समर वंडरलँड'चा आनंद घेता आला त्याबद्दल सरनाईक टीमचे अभिनंदन करतो. हे सरकार सगळ्यांचे आहे आपले सरकार आहे. तुम्हाला ज्या सुविधा हव्या आहेत त्या सुविधा देणार. तुमचा ठाणेकर राज्याचा मुख्यमंत्री आहे. ठाण्यात सर्व नागरी सोयी सुविधा दिल्या दिल्या जातील. त्यासाठी निधी कमी पडणार नाही. ही सगळी विकासकामे करत असताना 'समर वंडरलँड'सारख्या अशा कार्यक्रमांची सुद्धा आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
घोडबंदरचा पाणी प्रश्न सोडविणार
पूर्वेश सरनाईक यांनी मला घोडबंदर रोड भागातील पाण्याचा विषय सांगितला. घोडबंदर भागात पाणी सगळ्यांना मिळाले पाहिजे. यासाठी जी योजना राबवायची आहे ती योजना लवकर कार्यान्वित करू. घोडबंदर भागात नवीन संकुले, सोसायटी, टॉवर झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांना पाणी जास्तीचे आवश्यक आहे. सगळ्यांना पाणी देण्यासाठी ठाणे मनपा व राज्य सरकारच्या माध्यमातून काम केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
ठाणे मेट्रोच्या कामाला गती, सर्व मेट्रो एकमेकांना जोडणार
मुंबई प्रमाणेच ठाणे , मीरा-भाईंदर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रो कारशेडचे काम प्रलंबित होते. तो निर्णयही मी आमदारांच्या मागणीप्रमाणे घेतला आहे. मेट्रोचे स्टेशन बाजूलाच येणार आहे. तुम्ही नागरिक पायी जाऊन मेट्रोत बसू शकाल. ठाणे, मुंबई, भाईंदर असे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोचे पूर्ण नेटवर्क पुढील दोन वर्षात तयार होईल. मेट्रो आल्याने ६० ते ७० लाख खासगी वाहने रस्त्यावरून कमी होतील. ऐसी मेट्रोचा आरामदायी प्रवास करता येईल आणि मुंबई कल्याण डोंबविली ठाणे मेट्रो एकमेकांशी जोडतोय. एका मेट्रो मध्ये बसल्यानंतर कुठेही नागरिक त्याच मेट्रोने कुठूनही आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतो. मेट्रो आल्याने प्रवासाचा वेळ वाचेल, आपली कार्य क्षमता वाढेल. प्रवासाचा वेळ वाचल्याने आपण आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकू, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.