शिंदेंना कोपरी-पाचपाखाडीत अडकवून ठेवण्याची खेळी?

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शिवसेना नेत्यांच्या भेटी वाढल्या
शिंदेंना कोपरी-पाचपाखाडीत अडकवून ठेवण्याची खेळी?

शिवसेनेत उभी फूट पाडत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार करत भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या गटाला मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत शिंदेच्या विरोधात मोठा असंतोष असून, आदित्य ठाकरे यांनी थेट कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मदारसंघातून निवडणूक लढवण्याची आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे. दरम्यान, या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका वाढल्या असून, शिवसेना नेत्यांच्या फेऱ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची रणनीती महाविकास आघाडीकडून आखण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे .

तलावांचे शहर आणि राज्यातील सांस्कृतिक उपराजधानी, अशी ओळख असलेल्या ठाणे शहराचे राजकीय वातावरण गेल्या काही दिवसात चांगलेच बिघडले असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दशकात महापालिकेवर मूळ शिवसेनेची सत्ता अबाधित होती. सुरवातीच्या काळात तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि तेव्हाचे काँग्रेस आणि नंतरचे राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांच्यात वेळोवेळी राजकीय संघर्ष झाले; मात्र त्यांची वैयक्तिक मैत्री कधीच कमी झाली नाही, किंवा त्यांच्यात कटुताही आली नाही. सध्या राज्याचे नेतृत्व ठाणेकर असलेले एकनाथ शिंदे हे करत आहेत. त्यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट पाडून ४० आमदारांसह भाजपला पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे मात्र त्यांनतर मूळची शिवसेना आणि नवी बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात लहानमोठ्या कारणावरून ठिणग्या उडू लागल्या आहेत. श्रीनगर पोलीस ठाण्यात दोन गटात झालेली धुमचक्री, शिवाई नगर शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून झालेला वाद तसेच गेल्याच आठवड्यात रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेली मारहाण त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात वाद विकोपाला गेला आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची धुरा सांभाळल्यापासून राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यातील शिंदे सरकारने आव्हाडांना घेरण्यास सुरवात केली असल्याने राष्ट्रवादीतही मोठा असंतोष आहे, तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते गिरीश कोळी यांना शिंदे समर्थकांनी मारहाण केल्याने काँग्रेस कार्यकर्तेही संतप्त आहेत. त्यामुळे कोपरी-पाचपाखाडी या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावर महाविकास आघाडीने विशेष लक्ष केंद्रित केले असून, स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे.

बड्या नेत्यांची वादळी वर्दळ

दोन दिवसांपुर्वी काँग्रेस पक्षाच्या राज्यकार्यकारणीची बैठक ठाण्यात झाली. दशहत मोडून काढण्यासाठी आम्ही ठाण्यात बैठक घेतली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी झाडून सारे नेते हजर होते. त्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाण्यात येऊन गेले, तर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेत्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याही फेऱ्या ठाण्यात वाढल्या असताना, शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यातून झाली. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीने मोर्चा काढला, तर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात माजी मंत्री आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी कार्यक्रम करत आव्हान दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in