

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामनिर्देशन अर्ज छाननी व माघार प्रक्रियेनंतर आता चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण ६४१ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, निवडणूक प्रक्रियेसाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र वाटप, नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, छाननी तसेच नामनिर्देशनपत्र माघार घेण्याची प्रक्रिया पार पडली. या सर्व टप्प्यांनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अंतिम यादीत एकूण ६४१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यापैकी सहा उमेदवार संबंधित जागेसाठी एकटेच शिल्लक राहिले आहेत. या उमेदवारांबाबतचा उचित अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उर्वरित सर्व ६४१ उमेदवारांना रविवारी निवडणूक चिन्हांचे अधिकृत वाटप करण्यात आले.
प्रभाग समितीनिहाय अंतिम उमेदवारांची संख्या
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती - ९२
वर्तकनगर प्रभाग समिती - ६४
लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती - ८५
वागळे प्रभाग समिती - ३५
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती - ५२
उथळसर प्रभाग समिती - ५०
कळवा प्रभाग समिती - ८२
मुंब्रा प्रभाग समिती (२६-३१) - ३९
मुंब्रा प्रभाग समिती (३०-३२) - ४९
दिवा प्रभाग समिती (२७-२८) - ४२
दिवा प्रभाग समिती (२९-३३) - ५१