

ठाणे : महायुतीची घोषणा झाल्यानंतर ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपच्या समन्वय समितीची पहिलीच बैठक बुधवारी भाजपच्या कार्यालयात पार पडली. ठाण्यात शिंदे सेनेकडे अधिकचे नगरसेवक असल्याने त्यांनी जागा वाटपात योग्य तो सन्मान राखावा, अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी पुढील बैठकीत शिंदे सेनाच जागा वाटपाचा प्रस्ताव देणार असल्याचेही स्पष्ट झाले तसेच ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, महापौर महायुतीचाच बसेल आणि ११० पेक्षा अधिक जागा महायुतीच्या येतील, असा दावा यावेळी दोनही पक्षांकडून करण्यात आला. परंतु महायुतीचा घटक असलेला अजित पवार गटाला या बैठकीला पाचारण करण्यात न आल्याचे दिसून आले.
स्वबळाचा नारा देता देता ठाण्यात शिंदे सेना आणि भाजप आता युतीत लढणार आहे. वरीष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर बुधवारी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत दोनही पक्षांकडून महायुतीचा नारा देण्यात आला. भाजप पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीत शिंद सेनेचे खासदार नरेश म्हस्के, महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, राम रेपाळे आणि पूर्वेश सरनाईक उपस्थित होते. तर भाजपकडून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले आणि संजय वाघुले हे पदाधिकारी उपस्थित होते.
पाडापाडी नाही !
सव्वा तास चालेल्या या प्राथमिक बैठकीत दोनही पक्षाकडून महापालिकेत महायुतीचे अधिक नगरसेवक कसे निवडून येतील याचा नारा देण्यात आला. कोणीही कुठेही युतीच्या उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, यावरदेखील एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली तर ठाण्यात शिंदे सेनेकडे अधिकचे नगरसेवक असल्याने त्यांच्याकडून पुढील बैठकीत जागा वाटपाचा प्रस्ताव आणण्यात यावा, असे मत यावेळी भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु हा प्रस्ताव पुढे आणत असतांना भाजपचा योग्य तो सन्मान राखला जाईल याची काळजी घेतली जावी अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिंदे सेनेच्या इच्छुकांची आनंद आश्रमात झुंबड
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ठाण्यातील आनंद आश्रमात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसत आहे. बुधवारपासून शिंदे सेनेकडून इच्छुकांसाठी आनंद आश्रमात अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. यात आजी माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुक अर्ज घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. त्यात मागील २००७ पासून काही इच्छुक हे अर्ज घेऊन जाण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. परंतु आता पक्ष आपली दखल घेईल अशी अपेक्षा त्यांनी वाटत असून आता तरी तिकीट मिळणार का, असा सवाल या निमित्ताने त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.मागील २९ वर्षे ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे या सत्तेत आपणही सहभागी व्हावे, अशी अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. या रांगेत मागील तीन ते चार टर्म नगरसेवक असलेलेदेखील या रांगेत अर्ज घेण्यासाठी उभे होते तर अनेक नवीन चेहरे, जेष्ठांसह महिलांची संख्या ही अधिकची दिसून आली.
आता तरी संधी मिळेल का?
यावेळी अनेकांनी अर्ज घेताना आपली काहीशी भूमिका विषद केली आहे. त्यात काहींनी मी पहिल्यांदा अर्ज घेत आहे तर काहींनी युती झाल्याने आमचा नंबर लागणार का, अशा काहीशा भावना व्यक्त करुन दाखवल्या तर काहींनी मागील कित्येक वर्षापासून प्रत्येक निवडणुकीत लढण्यासाठी अर्ज घेत आहे. मात्र अद्यापही आपल्याला संधी मिळालेली नसल्याने आता तरी संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.