Thane Election : प्रचाराच्या गर्दीत प्रामाणिक कार्यकर्ता हरवला

अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला प्रचंड वेग आला असून विविध माध्यमांतून उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. मोठ्या संख्येने पदयात्रा, सभा व रॅली निघत असल्या तरी या प्रचारासाठी जमवण्यात आलेल्या गर्दीत खऱ्या, प्रामाणिक कार्यकर्त्याचा चेहरा मात्र हरवलेला दिसत आहे.
Thane Election : प्रचाराच्या गर्दीत प्रामाणिक कार्यकर्ता हरवला
Published on

ठाणे दर्पण

अतुल जाधव

अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला प्रचंड वेग आला असून विविध माध्यमांतून उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. मोठ्या संख्येने पदयात्रा, सभा व रॅली निघत असल्या तरी या प्रचारासाठी जमवण्यात आलेल्या गर्दीत खऱ्या, प्रामाणिक कार्यकर्त्याचा चेहरा मात्र हरवलेला दिसत आहे. उमेदवारांनी जमवलेली ही गर्दी म्हणजे भाड्याने आणलेल्या माणसांची जत्राच असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. भाड्याने आणलेल्या गर्दीत प्रचाराचा तो उत्साह आणि जोश दिसत नसल्याने पक्षाच्या नेतृत्वातही चिंता वाढत चालली आहे.

यामागील मुख्य कारण म्हणजे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांत उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर झालेले पक्षांतर. निष्ठावंत, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून केवळ 'जिंकण्याची क्षमता' आणि 'प्रतिमा' असलेला चेहरा हाच एकमेव निकष ठेवून तिकीट वाटप करण्यात आले. परिणामी, पक्षांतर करून आलेले नवे चेहरे तुपाशी आणि जुने निष्ठावंत कार्यकर्ते उपाशी असे चित्र सर्वच पक्षांत स्पष्टपणे दिसून आले. याचाच परिणाम म्हणून सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी उफाळून आली.

प्रचाराला काही दिवस उरले असतानाच युती आणि आघाडीतील गोंधळ अधिकच स्पष्ट होत चालला आहे. बाहेरून युती-आघाडीचा गाजावाजा, संयुक्त सभा आणि एकत्रित प्रचार दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र इतरत्र कुणालाही मत द्या, पण एक हक्काचे मत माझ्या पारड्यात टाका असा छुपा वैयक्तिक प्रचार अनेक उमेदवार करत असल्याचे चित्र आहे. एकीकडे पॅनल पद्धतीने एकदिलाने मतदान व्हावे, यासाठी पक्ष प्रयत्नशील असताना काही उमेदवार मात्र आपले जुने हिशेब चुकते करण्यासाठी पक्षविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, काही प्रभागांमध्ये युतीतीलच उमेदवार एकमेकांविरोधात अप्रत्यक्ष प्रचार करत असल्याची चर्चा रंगली आहे. मी निवडून आलो पाहिजे, बाकी कोण जिंको वा हरो याची जबाबदारी पक्षाची अशी मानसिकता उमेदवारांमध्ये बळावत चालल्याने युती-आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. यामुळे युतीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होत आहे. जर उमेदवारालाच युतीवर विश्वास नसेल, तर मतदारांनी तरी तो का ठेवावा? असा प्रश्न आता मतदारांना पडू लागला आहे.

विकास की निष्ठा यांच्यात लढत

ठाण्यातील ही निवडणूक आता केवळ पक्ष विरुद्ध पक्ष अशी न राहता उमेदवार विरुद्ध उमेदवार अशीच लढली जात असल्याचे चित्र आहे. याचा थेट परिणाम मतदानाच्या पद्धतीवर, मतविभाजनावर आणि अंतिम निकालावर होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे युती-आघाडीचा झेंडा हाती घेतलेला असताना, दुसरीकडे स्वतःचे पारडे जड करण्यासाठी उमेदवारांकडून केले जाणारे प्रयत्न यामुळे निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता वाढली आहे. उमेदवारी न मिळाल्याने सर्वच पक्षांत असंतुष्ट कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. काही नाराज कार्यकर्ते विरोधी उमेदवारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रसद पुरवत असल्याने उमेदवारांचे टेन्शन अधिक वाढले आहे. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा राजकीय वर्चस्वासाठी लढल्या जाणाऱ्या या निवडणुकीत नेमके जिंकले कोण-विकास की निष्ठा-हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

वैयक्तिक पातळीवरील चारित्र्यहननालाच ऊत

पक्षांतर्गत चर्चा, समजूत काढण्याचे प्रयत्न आणि मनधरणी करण्यात आली. काहींनी अर्ज मागे घेतले असले तरी 'मला डावलले गेले' ही सल त्यांच्या मनात कायम राहिली आहे. त्यामुळेच ही महापालिकेची निवडणूक आता विचारांची न राहता आरोपांची निवडणूक बनत चालली आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवरही झाला आहे. प्रचारसभांमध्ये स्थानिक प्रश्न, विकासाचे मुद्दे मागे पडले असून आरोप-प्रत्यारोप, जुने वाद उकरून काढणे, बदनामी आणि वैयक्तिक पातळीवरील चारित्र्यहनन यालाच ऊत आलेला दिसून येतो.

स्वतःच्या मतपेटीसाठीच राजकारण

युती किंवा आघाडीचा उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले अनेक उमेदवार पक्षाची किंवा युतीची एकत्रित ताकद वापरण्याऐवजी स्वतःची वैयक्तिक ओळख, आर्थिक बळ, समाजगटांचे समीकरण, भावनिक अपील आणि अंतर्गत रणनीती यांवरच अधिक भर देताना दिसून येत आहेत. सार्वजनिक व्यासपीठावर युती एकसंध आहे, असा दावा केला जात असला तरी गल्लोगल्ली, बैठकीत आणि बंद दाराआड मात्र युतीचा विचार बाजूला ठेवून स्वतःची मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठी राजकारण सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in