

ठाणे : ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नसतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणुकीच्या रिंगणात मोठी झेप घेतली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात रविवारी उशिरा रात्री मनसेच्या २४ इच्छुक उमेदवारांना ‘एबी फॉर्म’चे वाटप करण्यात आले.
ठाणे-पालघर जिल्हा सचिव नैनेश पाटणकर यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. युती किंवा आघाडीच्या चर्चेची वाट न पाहता, मनसे आपल्या उमेदवारांना मैदानात उतरवून प्रचारात आघाडी घेण्याच्या तयारीत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
प्रभागनिहाय प्रमुख उमेदवार :
एबी फॉर्म मिळालेल्या २४ उमेदवारांपैकी काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत -
उमेदवार प्रभाग क्रमांक
रवींद्र मोरे प्रभाग २, निलेश चव्हाण प्रभाग ३, पुष्कर विचारे प्रभाग ५, स्वप्नाली खामकर-पाचंगे प्रभाग ७, सचिन कुरेल प्रभाग ८, रश्मी सावंत प्रभाग १६, सविता मनोहर चव्हाण प्रभाग २०, संगीता जोशी प्रभाग २१
एकीकडे जागावाटपाचे पेच सुटलेले नसताना मनसेने घेतलेला हा पुढाकार ठाण्यातील राजकीय वातावरण तापवणारा ठरला आहे. या उमेदवारांच्या घोषणेमुळे आणि एबी फॉर्मच्या वाटपामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता इतर पक्ष आपली उमेदवारी कधी जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घराघरांत जाऊन प्रचार
ठाणे मनपाच्या प्रभाग क्रमांक ५ मधून पुष्कर विचारे यांना ‘एबी फॉर्म’ मिळाल्यानंतर ते आता ॲॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आमचे कार्यकर्ते प्रभागातील घरात जाऊन नागरिकांशी संवाद साधतील. गृहनिर्माण संस्था आणि सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर असेल. प्रचारात आजवर केलेल्या कामांची माहिती जनतेसमोर ठेवणार आहेत. महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा प्रचार एकत्रितपणे राबवला जाईल. ‘प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष भेट’ हेच विजयाचे सूत्र मानून आम्ही मैदानात उतरणार असल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात मनसेची ‘एक प्रभाग, एक उमेदवार’ रणनीती
आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीत मनसेने ठाण्यात आपली ताकद आजमावण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी प्रभागनिहाय उमेदवारीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून, ठाण्यातील प्रत्येक प्रभागात एक प्रबळ उमेदवार देण्यावर पक्षाचा भर असल्याचे संकेत दिले आहेत. उमेदवारी अर्जांवर लक्ष निवडणुकीच्या पुढच्या रणनीतीबद्दल बोलताना संदीप पाचंगे यांनी सांगितले की, सध्या पक्षाची प्राथमिकता ही अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्याला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रचाराची दिशा आणि सविस्तर रणनीती जाहीर केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. ज्या ज्या प्रभागांमध्ये पक्षाची ताकद आहे, तिथे प्रत्येकी एक जागा देऊन रणनीती आखण्यात आल्याचे पाचंगे यांनी स्पष्ट केले आहे.