ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्रभाग क्रमांक २३ मधील चार मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला आहे. हा निर्णय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग क्र. २३ मधील मतदान केंद्र क्रमांक २३, २४, २५ व २६ ही मतदान केंद्रे मतदार वास्तव्यास असलेल्या ठिकाणांपासून दूर असल्याने ती बदलण्यात यावीत, अशी मागणी प्रभागातील चार उमेदवारांनी अर्जाद्वारे केली होती. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी व कार्यकारी अभियंता, कळवा प्रभाग समिती यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष जागेवर जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान मतदारांचे रहिवासाचे ठिकाण, मतदार यादीत समाविष्ट क्षेत्र तसेच सुलभता यांचा साकल्याने विचार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मूळ मतदान केंद्रांची ठिकाणे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
मतदान केंद्र निश्चित झाल्यानंतर व त्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत मतदान केंद्राचे स्थान किंवा इमारत बदलायची असल्यास संबंधित उमेदवारांशी विचारविनिमय करून महानगरपालिका आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच असा बदल केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगास अवगत करणे बंधनकारक असल्याचे आयोगाच्या निर्देशात नमूद आहे. या निर्देशांनुसार प्रभाग क्र. २३ च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल योग्य असल्याने चारही मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
सुधारित मतदान केंद्रांची माहिती
मतदान केंद्र क्र. २३/२३ : सायबा क्रीडानगरी मैदानातील मंडप, सायबा हॉलच्या बाजूला, मनीषानगर, कळवा
मतदान केंद्र क्र. २३/२४ : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा आरोग्य केंद्रासमोरील मोकळी जागा, मनीषानगर, कळवा
मतदान केंद्र क्र. २३/२५ : हॅलो किड्स, मनीषानगर, रूम नं. १ (केंद्र क्र. २५)
मतदान केंद्र क्र. २३/२६ : हॅलो किड्स, मनीषानगर, रूम नं. २ (केंद्र क्र. २६)