

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात, गेल्या अनेक वर्षांनंतर मनोमिलन झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा सोमवारी (दि. १२ जानेवारी) ठाण्यात होणार आहे. गडकरी रंगायतन येथील मूस चौकात ही महत्त्वाची सभा पार पडणार असून, या सभेतून ठाकरे बंधू ठाणेकरांना नेमका कोणता संदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे विभक्त राजकीय प्रवास हे गेल्या दोन दशकांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते. मात्र अलीकडे दोघांमध्ये झालेल्या सलोख्यामुळे ठाकरे घराण्यातील एकी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ठाणे हा शिवसेनेसाठी पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असला, तरी मागील काही वर्षांत येथील सत्तासमीकरणे बदलली असून भाजपने आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे.
दरम्यान, सोमवार, १२ जानेवारी रोजी होणाऱ्या या संयुक्त सभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची ही सभा ठाण्याच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार का, याकडे केवळ ठाणेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.