Thane : बिनविरोध उमेदवारांबाबत पालिकेला २४ तासांचा अल्टिमेटम; २५व्या तासाला आयुक्तांच्या दालनात ठिय्या; अविनाश जाधवांचा इशारा

मंगळवारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी सौरव राव यांची भेट घेऊन या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर २४ तासांत कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
अविनाश जाधव यांचे संग्रहित छायाचित्र
अविनाश जाधव यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)च्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आल्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे यांची भूमिका संशयास्पद असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. याप्रकरणी २४ तासांत कारवाई न झाल्यास २५व्या तासाला महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

मंगळवारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी सौरव राव यांची भेट घेऊन या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर २४ तासांत कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी, माहितीच्या अधिकारातून (RTI) या अधिकाऱ्यांची भूमिका उघड करण्याचा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

मनसेचा आरोप आहे की, सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून पक्षपाती भूमिका घेत प्रभाग क्रमांक १८ मधील मनसेसह अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज कपटनीतीने बाद करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील निवडणूक निर्णय अधिकारी सत्वशिला शिंदे यांची भूमिका देखील वादग्रस्त ठरली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात आल्याचे चित्रीकरणही अविनाश जाधव यांनी यापूर्वी जाहीरपणे प्रदर्शित केले होते.

महापौरही बिनविरोध बसण्याची भीती

या बिनविरोध प्रक्रियेत झालेल्या कथित घोळाबाबत मनसेने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सविस्तर तक्रार दाखल केली असून, न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. जर हा बिनविरोध निवडणुकांचा ट्रेंड असाच सुरू राहिला, तर पुढील टप्प्यात महापौरही बिनविरोध बसेल, अशी भीती अविनाश जाधव यांनी व्यक्त केली.

वचननाम्यात महायुतीने ‘रेटकार्ड’ जाहीर करावे

भाजप-वायुसेना महायुतीने मंगळवारी जाहीर केलेल्या वचननाम्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार टीका केली. महायुतीने त्यांच्या वचननाम्यातच रेटकार्ड जाहीर करावे. अपक्ष उमेदवाराला ५० लाख, शिवसेनेच्या उमेदवाराला २ कोटी, मनसेच्या उमेदवाराला ३ कोटी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला ५० लाख. तसेच पुढील निवडणुकीत कुणाला किती पैसे दिले, हेही वचननाम्यात नमूद करावे. तेव्हाच भाजप खऱ्या अर्थाने ‘प्रगतशील’ पक्ष ठरेल, असा उपरोधिक टोला अविनाश जाधव यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in