

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असताना, अद्यापही अनेक ठाणेकरांच्या हाती अधिकृत व्होटर स्लिप पोहोचल्या नसल्याची बाब समोर आली आहे. तर ज्या मतदारांना स्लिप मिळाल्या आहेत, त्यामध्येही मोठ्या प्रमाणावर घोळ आढळून आला असून, नाव आणि अनुक्रमांक योग्य असले तरी पत्ते बदलले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक व्यवस्थेतील घोळ शेवटच्या टप्प्यातही उघडकीस आला आहे.
ठाण्यातील घोडबंदर भागातील ब्रह्मांड, हिरानंदानी इस्टेट, ऋतुपार्कसह इतर परिसरातील अनेक मतदारांच्या नावापुढे छापण्यात आलेल्या पत्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मतदार यादीतील नाव आणि अनुक्रमांक अचूक छापण्यात आले आहेत; मात्र त्यापुढे असलेला पत्ता हा दुसऱ्याच इमारतीचा किंवा वेगळ्या ठिकाणचा नमूद करण्यात आला आहे. अनेक प्रकरणांमध्ये फ्लॅट क्रमांकही चुकीचा छापून आल्याचे आढळून आले आहे.
या चुकीच्या पत्त्यांमुळे अनेक मतदारांच्या व्होटर स्लिप दुसऱ्याच इमारतींमध्ये जात असल्याचे चित्र आहे. संबंधित पत्त्यावर नाव शोधण्याचा प्रयत्न केला असता, अशी व्यक्ती त्या इमारतीत राहतच नसल्याचे समोर येत आहे. परिणामी, व्होटर स्लिप वाटप करणाऱ्यांचाही गोंधळ उडाला असून, विविध राजकीय पक्षांकडून वाटण्यात येणाऱ्या स्लिप्स चुकीच्या पत्त्यांवर पोहोचत आहेत.
या संदर्भात हिरानंदानी इस्टेट परिसरात वास्तव्यास असलेले प्रदीप राव यांनी सांगितले की, “माझ्या घराचा पत्ता व्होटर स्लिपवर चुकीचा दाखविण्यात आला आहे. मतदानावेळी ओळखपत्र सादर करताना पत्ता जुळला नाही, तर मतदान करता येईल की नाही, याची चिंता वाटत आहे.”
दरम्यान, मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक असताना देखील महापालिका प्रशासनाकडून वाटप करण्यात येणाऱ्या अनेक व्होटर स्लिप अद्याप मतदारांपर्यंत पोहोचलेल्या नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, महापालिकेकडून व्होटर स्लिपचे वाटप सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
यासंदर्भात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले की,आम्ही विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारेच काम केले आहे. त्यामधील उपलब्ध माहितीनुसारच व्होटर स्लिप तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा घोळ आमचा नसून, व्होटर स्लिपचे वाटप सुरू असून ते पूर्ण केले जाईल.
ठाण्यात आचारसंहितेच्या १६ तक्रारी दाखल
आचारसंहिता भंगाच्या एकूण १६ तक्रारी ठाणे महापालिकेच्या अंमलबजावणी पथकाकडे प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून म्हणजेच १५ डिसेंबरपासून ठाणे शहरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून नोडल अधिकारी, फ्लाइंग स्कॉड तसेच सर्व्हिलन्स पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमार्फत शहरातील विविध भागांत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
या तपासणीत १५ डिसेंबर ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत ठाणे शहरात केवळ ९ हजार ५४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मात्र, कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर मद्य आणि अमली पदार्थांवर प्रशासनाने हात टाकला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १७ लाख ५६ हजार रुपयांच्या किमतीचे १६ हजार ८३९ लिटर मद्य जप्त करण्यात आले असून, तब्बल ९ कोटी ६६ लाख ९० हजार रुपयांचे अमली पदार्थही हस्तगत करण्यात आले आहेत.
याशिवाय निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण १ हजार ४६३ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.