
ठाणे : ठाणेकरांच्या गारेगार व पर्यावरणपूरक प्रवासाच्या आशा आणखी काहीकाळ लांबल्या आहेत. पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेंतर्गत ठाणे परिवहन सेवेला मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यातील २५ इलेक्ट्रिक बसेस तांत्रिक अडचणींमुळे अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे या बसेस दाखल होण्यासाठी किमान महिनाभराचा विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यातील वाढती लोकसंख्या आणि जुन्या, नादुरुस्त टीएमटी बसगाड्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर नेहमीच टीका होत असते. नागरिकांचा प्रवास सुखकर आणि प्रदूषणविरहित करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा निर्णय घेतला.
पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेतून ठाणे परिवहनला एकूण १०० नवीन बस मिळणार आहेत. यामध्ये ९ मीटर लांबीच्या ६० आणि १२ मीटर लांबीच्या ४० वातानुकूलित बसचा समावेश आहे. या बसेस मार्च अखेरीपर्यंत दाखल होणे अपेक्षित होते; मात्र आधी जुलैपर्यंत आणि आता पुन्हा तांत्रिक अडचणींमुळे त्यात विलंब झाला आहे. सध्या या बसेसची तांत्रिक दुरुस्ती व पुन्हा परीक्षणाचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतरच त्या ठाणे परिवहनच्या ताफ्यात दाखल होतील. या विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, सुधारित आणि पर्यावरणस्नेही बससेवेची प्रतीक्षा ठाणेकरांना अद्याप कायम राहणार आहे.
७५ हजार रुपयांची बचत
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत आधीच १२३ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून, त्या घोडबंदर-बोरीवली, ठाणे-खिडकाळी आदी मार्गांवर धावत आहेत. या वातानुकूलीत बसमुळे डिझेल बसच्या तुलनेत मोठी बचत होते. एका इलेक्ट्रिक बसमुळे दररोज सुमारे २५ रुपये प्रति किमी, म्हणजेच महिन्याला जवळपास ७५ हजार रुपयांची बचत ठाणे परिवहनची होत आहे.