
ठाणे : खंडित वीजपुरवठ्याचा फटका इलेक्ट्रिक बसला बसत असून वीज नसल्यामुळे बसेस चार्जिंग करण्यास अडचण येत आहे. परिणामी बसेस रस्त्यावर येत नसल्याने प्रवाशांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे कोपरी येथील इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने परिणामी रस्त्यावर अतिशय तुरळक इलेक्ट्रिक बस धावल्याचे दिसून आले. शुक्रवारी रस्त्यावर १२३ पैकी ५४ आणि शनिवारी अवघ्या १७ बस रस्त्यावर धावल्या.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० च्या आसपास बस आहेत. त्यातील २१० बस या सीएनजी आणि डिझेलवर धावणाऱ्या बस आहेत, तर नव्याने परिवहनच्या ताफ्यात १२३ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. ठाणे पूर्व येथील या इलेक्ट्रिक बस डेपोत चार्ज केल्या जात आहेत. मागील ८ ते १० दिवसांपूर्वी सततच्या पावसाचा फटका याच इलेक्ट्रिक बसला आहे. त्यात शुक्रवारी
४ ते ५ लाखांचे नुकसान
चार्जिंग स्टेशन येथील स्टेबिलायझर खराब झाल्याने व महावितरणच्या केबलमध्ये देखील बिघाड झाल्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार तो सुरळीत करण्यासाठी शनिवारी सकाळपासून महावितरणचे पथक दाखल झाले. चार्जिंग अभावी बसेस डेपोत उभ्या असल्यामुळे जवळपास ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सकाळी ९ वाजता तांत्रिक कारणांमुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा परिणाम म्हणून १२३ पैकी केवळ ५४ बस रस्त्यावर धावल्या. त्यानंतर शनिवारीसुद्धा वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने केवळ १७ बस रस्त्यावर धावल्या. त्याचे चार्जिंग एसटीच्या खोपट डेपोतून करण्यात आले होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने सकाळी बसचा ताबा घेण्यासाठी आलेल्या चालक आणि वाहकांना डेपोतच बसून राहण्याची वेळ आली. कोपरी येथील डेपोत तब्बल १०६ च्या आसपास बस उभ्या असल्याचे दिसून आले. या संदर्भात परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी १७ इलेक्ट्रिक बस बाहेर पडल्याचे मान्य केले.