

ठाणे : आधीच पाणी कपातीमुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या संकटात आता वीज खंडित होण्याची भर पडल्याने ठाणेकर त्रस्त झाले आहेत. शहरात पावसाने जोर पकडलेला नाही तरीही ठाणे आणि घोडबंदर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
पावसाळ्यापूर्वी महावितरण, ठाणे महापालिका आणि विविध यंत्रणांकडून आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल कामे केली जातात. या कामांमुळे पावसाळ्यातील अडचणी कमी होतील, अशी अपेक्षा असते. मात्र, यंदा पावसाच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
घोडबंदर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने यापूर्वीही वारंवार वीजपुरवठा खंडित झाला होता. आता पावसाचा जोर कमी असतानाही दिवस-रात्र वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाऊस सुरू झाल्यावरही वीज गेल्यानंतर घरात राहणेही कठीण होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर उंच इमारती आणि गृहसंकुलांमधील पाणी उचलणारे पंप बंद पडत असल्याने पाणीपुरवठा आणखी विस्कळीत होत आहे. त्यामुळे आधीच भेडसावणारी पाणीटंचाई अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे. घरातून काम करणाऱ्या नोकरदार वर्गालाही इंटरनेट आणि संगणक सेवा बंद पडल्याने मोठा फटका बसत असून त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूर्वसूचना न देता होत असलेल्या वीज खंडितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, व्यावसायिक आणि घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक रहिवासी संघटनांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सावरकरनगर परिसरात मंगळवारी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली असून, वीज पुरवठ्याच्या प्रश्नाबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तत्काळ उपाययोजना सुरू
शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित झाला असून तो पूर्ववत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले.