Thane : चार्जिंग स्टेशनची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात; वाहनधारकांना दिलासा मिळणार

शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्याचे पालिकेचे धोरण आहे. ठाणे महानगरपालिका ई-वाहन सुविधांवर भर देत आहे. याचाच भाग म्हणून महापालिका हद्दीत सार्वजनिक ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचा रखडलेला प्रकल्प आता मार्गी लागण्याच्या स्थितीत असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे
चार्जिंग स्टेशनची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात; वाहनधारकांना दिलासा मिळणार
चार्जिंग स्टेशनची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात; वाहनधारकांना दिलासा मिळणार
Published on

ठाणे : शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्याचे पालिकेचे धोरण आहे. ठाणे महानगरपालिका ई-वाहन सुविधांवर भर देत आहे. याचाच भाग म्हणून महापालिका हद्दीत सार्वजनिक ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचा रखडलेला प्रकल्प आता मार्गी लागण्याच्या स्थितीत असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या प्राप्त निविदांमधील तांत्रिक कागदपत्रांची छाननी सुरू आहे.

महापालिकेच्या २०२२ मधील महासभा ठरावानुसार शहरातील ३० संभाव्य जागांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यापैकी १९ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणी व्यवहार्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग केंद्रांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील १० टक्के हिस्सा महापालिकेला मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे १० कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ती संपूर्ण खर्च निविदाधारकाकडूनच करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेला प्रति युनिट किमान १ रुपया दराने जास्तीत जास्त महसूल देणाऱ्या संस्थेची निवड केली जाणार आहे. तांत्रिक पडताळणीनंतर पात्र निविदाधारकांची अंतिम निवड करून पुढील प्रक्रिया राबवली जाईल.

चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निवडलेल्या ठेकेदाराला महापालिकेकडून ४ ते ५ मीटर रुंद आणि २० ते ३० मीटर लांबीची जागा १० वर्षांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. उभारणीपासून संचालन, देखभाल, वीजजोडणी, आवश्यक परवानग्या आणि सुरक्षेची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. पहिल्या तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी निश्चित करण्यात आला असून, चार्जिंग दर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरवले जाणार आहेत.

नौपाडा, कोपरी, दिव्यात चार्जिंग स्टेशन उभारणार

दरम्यान, शहरातील नौपाडा-कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट, लोकमान्य सावरकर नगर, वर्तक नगर, माजिवडा-मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ई-वाहनधारकांसाठी चार्जिंगची सोय अधिक सुलभ होणार असून, ठाणे शहर हरित वाहतुकीकडे एक पाऊल पुढे टाकणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in