Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप

महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचा दावा केला असला, तरी मतदानाच्या पहिल्याच सत्रात तो फोल ठरल्याचे चित्र दिसून आले. सकाळी मतदान सुरू होताच शहरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड, मशीन बंद पडणे, एरर येणे तसेच सिरीयल क्रम चुकल्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप
छायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचा दावा केला असला, तरी मतदानाच्या पहिल्याच सत्रात तो फोल ठरल्याचे चित्र दिसून आले. सकाळी मतदान सुरू होताच शहरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड, मशीन बंद पडणे, एरर येणे तसेच सिरीयल क्रम चुकल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी मशीन बंद असल्याने तसेच यंत्रांवरील क्रम चुकीचा असल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

ठाणे शहर, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा परिसरात सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून येत होता. रोजच्या सवयीनुसार पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक चालता-चालताच जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावत होते. मात्र घोडबंदर, बाळकुम, कोलशेत, नौपाडा आदी भागांत अनेक मतदान केंद्रांवर मशीन बंद पडणे, मशीनला करंट जाणे, एरर येणे अशा तक्रारी समोर आल्याने नागरिकांना दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागले.

ज्येष्ठ, महिला व नोकरदारांची अडचण

ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच नोकरदार वर्गाने आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य देत मतदानासाठी प्रयत्न केले. मात्र काही ठिकाणी एक ते दोन तास प्रतीक्षा करूनही मतदान न झाल्याने अनेक मतदार मतदान न करताच परतताना दिसले. याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला.

ठाणे मतदानाची टक्केवारी

७.३० ते ९.३० = ८%

९.३० ते ११.३० = १९%

११.३० ते १.३० = ३०.७५ %

१.३० ते ३.३० = ४१ %

पहिल्या दोन तासांत अवघे ८ टक्के मतदान

ईव्हीएममधील घोळ, मशीन बंद पडणे व तांत्रिक त्रुटींमुळे सकाळच्या पहिल्या दोन तासांत केवळ ८ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतून १३१ नगरसेवक निवडले जाणार असून, शहरातील घोडबंदरपासून कोपरीपर्यंत वागळे, इंदिरानगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, बाळकुम, कोलशेत, नौपाडा आदी भागांत तांत्रिक अडचणींचा फटका बसला.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

विविध मतदान केंद्रांवरील ठळक घटना

प्रभाग क्र. ३ : सेंट झेवियर्स शाळेतील खोली क्र. १० व १२ मधील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; एका मशीनला करंट जाण्याचा प्रकार. अर्धा तास मतदान थांबवावे लागले.

नौपाडा : सरस्वती विद्यालयातील मशीन बिघडल्याने दीड तास मतदान खोळंबले.

प्रभाग क्र. ८ : ब्लॉसम शाळेत ३ ते ४ मशीनमध्ये एरर; १० ते १५ मिनिटे उशीर.

कोलशेत (खालचा गाव) : मनपा शाळेत दीड तास उशिराने मतदान सुरू; ३ ते ४ मशीनमध्ये एरर.

मनोरमा नगर (प्रभाग ३) : ज्ञानपीठ विद्यालयात सिरीयल नंबर चुकीच्या पद्धतीने लावल्याने मतदान उशिरा सुरू

काजूवाडी : बोगस मतदार पकडला; संबंधित मतदाराच्या नावाने आधीच मतदान झाल्याचा प्रकार उघड.

प्रभाग १४ (आर. जे. ठाकूर केंद्र) : दोन मशीन तब्बल एक तास बंद; अनेक मतदार मतदान न करता परतले.

logo
marathi.freepressjournal.in