
ठाणे : मुंबई महापालिकेच्या पिसे व पांजरापूर येथील विद्युत केंद्रात वीज मीटर अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आपल्या जलवाहिनी नेटवर्कमधील पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहराला मिळणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यावर याचा थेट परिणाम होणार असून, मंगळवार, ७ ते गुरुवार, ९ ऑक्टोबर या कालावधीत ठाण्यात १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राला विविध स्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सुमारे ८५ एमएलडी पाणी मुंबई महापालिकेकडून मिळते. या पाणीसाठ्यातून नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, किसननगर क्र. १ व २, शिवाजी नगर, पडवळ नगर, रामचंद्र नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा क्र. १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणीपुरवठा केला जातो.
या सर्व भागात तीन दिवस १० टक्के पाणीकपात राहणार असून नागरिकांना पूर्वतयारी म्हणून आवश्यक पाणी साठवून ठेवण्याचे आणि त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.