ठाणे : टीएमटीवर आर्थिक संकट; परिचलनापोटीची ५२ कोटींची थकबाकी

परिचलनापोटी कोरोना काळापासूनची तब्बल ५२ कोटींची थकबाकी थकल्याने, थकबाकी भरा अन्यथा बसेस चालवणे कठीण होईल, असा इशारा परिवहन प्रशासनाला संबंधित कंपनीने दिला आहे.
ठाणे :  टीएमटीवर आर्थिक संकट; परिचलनापोटीची ५२ कोटींची थकबाकी
Published on

ठाणे : परिचलनापोटी कोरोना काळापासूनची तब्बल ५२ कोटींची थकबाकी थकल्याने, थकबाकी भरा अन्यथा बसेस चालवणे कठीण होईल, असा इशारा परिवहन प्रशासनाला संबंधित कंपनीने दिला आहे. थकबाकी कधी भरायची याची मुदत देण्यात आली नसली तरी थकबाकीचा प्रश्न लवकरच निकाली न निघाल्यास कंपनीमार्फत चालवण्यात येणाऱ्या तब्बल २४० बसेस कधीही बंद ठेवण्याची पाळी परिवहन प्रशासनावर येण्याची चिन्हे आहेत. अशी परिस्थिती ओढवल्यास टीएमटीच्या ३८० पैकी केवळ १५० बसेसच रस्त्यावर धावू शकणार आहेत. परिणामी सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे.

ठाणे परिवहन सेवा ही सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांची लाइफलाइन मानली जाते. आजच्या घडीला टीएमटीच्या तब्बल ३८० पेक्षा अधिक बसेस रस्त्यावर धावत आहेत, तर या बसेसमधून जवळपास पावणेतीन लाख प्रवासी हे दररोज प्रवास करतात. परिवहनच्या ताफ्यात ४०० पेक्षा अधिक बसेस असून यामध्ये ३८० बसेस रस्त्यावर धावतात. यामध्ये जवळपास २४४ बसेस या खासगी कंपनीच्या माध्यमातून चालवण्यात येत असून वाहक आणि चालक संबंधित कंपनीच्या माध्यमातून पुरवले जातात. मात्र कोरोनापासून संबंधित कंपनीची तब्बल ५२ कोटींची थकबाकी थकली असून ही थकबाकी अद्याप देण्यात आलेली नाही. यासंदर्भात संबंधित कंपनीसोबत परिवहन प्रशासनाची चर्चा सुरू असून यामध्ये थकबाकी मोठ्या प्रमाणात थकल्याने थकबाकी लवकर भरा, अन्यथा २४० बसेस चालवणे कठीण होणार असल्याचा इशारा कंपनीने दिला आहे. असे झाल्यास सध्या रस्त्यावर धावत असलेल्या ३८० बसेस पैकी २४० बसेस जर रस्त्यावर धावल्या नाहीत, तर केवळ १५० बसेसच रस्त्यावर धावणार असून यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांचे मात्र हाल होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यासंदर्भात गांभीर्याने विचार करून अनुदान स्वरूपात काहीतरी मदत करावी, अशी अपेक्षा परिवहन प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in