ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडाली

गावदेवी भाजी मंडईतील भीषण आगीत दोन जणांचा बळी गेल्यानंतर शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ठाणे महापालिकेच्या महासभेत समोर आलेल्या आकडेवारीने प्रशासनाची झोप उडवणारी वस्तुस्थिती उघड केली.
ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडाली
ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडालीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : गावदेवी भाजी मंडईतील भीषण आगीत दोन जणांचा बळी गेल्यानंतर शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच ठाणे महापालिकेच्या महासभेत समोर आलेल्या आकडेवारीने प्रशासनाची झोप उडवणारी वस्तुस्थिती उघड केली. शहरातील तेलाची गोडाऊने, बँक्वेट हॉल, लॉज, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांच्या अग्निसुरक्षेबाबत गंभीर अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले असून, कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली.

प्रश्नोत्तराच्या तासात भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी शहरातील तेलाच्या गोडाऊनांची संख्या, त्यांची कायदेशीर स्थिती आणि अग्निशमन विभागाच्या वापर परवान्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने दिलेल्या उत्तराने सभागृहात एकच खळबळ उडाली.

महापालिकेच्या माहितीनुसार, ठाणे शहरात नोंद असलेल्या १९ तेलाच्या गोदामांपैकी १६ गोदामे अनधिकृत आहेत. केवळ तीन गोदामांकडे अग्निशमन विभागाचा अधिकृत वापर परवाना आहे. शहरभर शेकडो बँक्वेट हॉल, लॉज, रेस्टॉरंट आणि पब सुरू असताना फक्त तीन बँक्वेट हॉल, १६ लॉज आणि ११३ रेस्टॉरंटनाच अग्निशमन विभागाचा वापर परवाना असल्याची माहिती उपायुक्त संचेती आणि मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी सभागृहात दिली.

यावेळी मृणाल पेंडसे यांनी कोलबाड परिसरातील दोन निवासी इमारतींमध्ये सुरू असलेल्या तेलाच्या गोदामाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. अशा धोकादायक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा केला जात असून भविष्यात आग लागल्यास गावदेवी भाजी मंडईपेक्षाही भीषण दुर्घटना घडू शकते. त्यावेळी इमारत अधिकृत की अनधिकृत, याचा विचार आग करणार नाही; मात्र निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांचे फायर ऑडिट सुरू असल्याचे सांगितले. ऑडिट पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल महासभेसमोर ठेवला जाईल.

कठोर कारवाईनंतर दुर्घटना टळेल

गावदेवी अग्निकांडानंतरही शहरातील अग्निसुरक्षेची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. फायर ऑडिट, परवाने आणि नियमांची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात कठोर कारवाई झाली तरच भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळता येतील, अशी भावना महासभेत व्यक्त करण्यात आली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in