Thane News : कबूतराला वाचवायला गेला, अग्निशामक जवानाने जीव गमावला; २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ

एका निष्पाप जीवासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणाऱ्या उत्सव पाटील यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत अग्निशामक जवान उत्सव पाटील (वय २८)
मृत अग्निशामक जवान उत्सव पाटील (वय २८) Insta/patil_utsav1333
Published on

ठाणे : ठाण्यात रविवारी सायंकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कबूतराला वाचवण्याच्या प्रयत्नात २८ वर्षीय अग्निशामक जवानाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर भाजला गेला. हा प्रकार दिवा-शिळ रस्त्यावर घडला.

मृत अग्निशामक जवानाची ओळख उत्सव पाटील (वय २८) अशी झाली असून, त्याचा सहकारी आझाद पाटील (वय २९) गंभीर जखमी झाला आहे. सध्या स्थानिक महापालिका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या घटनेची माहिती दिली आहे. एका निष्पाप जीवासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणाऱ्या उत्सव पाटील यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले?

महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रहिवाशांनी विजेच्या उच्चदाब तारेजवळील इलेक्ट्रिक बॉक्समध्ये अडकलेल्या कबूतराची माहिती दिली होती. ते कबूतर धोकादायक ठिकाणी अडकले होते. तेथे विद्युत प्रवाह सुरू असल्याने, त्याचा मृत्यू होण्याची तसेच शॉर्टसर्किट किंवा ट्रान्सफॉर्मरसारखा स्फोट होण्याची शक्यता होती. कबूतराला वाचवण्याच्या मोहिमेदरम्यान उत्सव पाटील यांचा हात चुकून उच्चदाबाच्या जिवंत तारेला लागला. विद्युत प्रवाहामुळे अचानक आग लागली आणि उत्सव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याला मदत करणारा आझाद पाटील गंभीर भाजला. अन्य अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले आणि जवळच्या महापालिका रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी उत्सवला मृत घोषित केले, तर आझादची प्रकृती गंभीर असून त्याचे हात आणि छाती भाजली आहे. महापालिकेच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत अतीव दुःख व्यक्त केले. “कबूतर विजेच्या ओव्हरहेड वायरमध्ये अडकले होते. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एक अग्निशामक जवानाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे,” असे अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

अंतर्गत चौकशी होणार

या बचाव मोहिमेदरम्यान सुरक्षा नियम आणि संरक्षक उपकरणांचा योग्य वापर झाला का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेमार्फत लवकरच या घटनेवर सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जाण्याची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in