

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण (Planetarium) शहापूर येथे उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन रविवार, दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते होणार आहे.
निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी खगोल शास्त्राची आवड जोपासत जनमानसात खगोल विज्ञानाविषयी रुची निर्माण व्हावी या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला आहे. शहापूर तालुक्यातील साकडभाव, पोकळेवाडीनजीक जुनोनी-कोथरा मार्गावर साडेतीन एकर जागेत हा ‘सॅपो’ प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पात अत्याधुनिक तारांगणासोबत चार मोठ्या दुर्बिणी असलेली वेधशाळा (Astronomical Observatory) उभारण्यात आली आहे. तारांगणात ५६ आसनव्यवस्था असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये अर्धा ते एक तासांचे खगोल शास्त्रीय शो दाखविण्याची सोय करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रदर्शन हॉल, ‘सेल्फ पॉइंट्स’, मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक तसेच खाद्यपदार्थांसाठी कॅन्टीनची सुविधा देखील उपलब्ध आहे. खगोलप्रेमींसाठी हा प्रकल्प मोठे आकर्षण ठरणार असून इच्छुकांनी पूर्वनोंदणी करूनच भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ठाकूर बंधूंनी उभारलेले हे तारांगण ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भर घालणारे ठरणार आहे.
सोलर फिल्टरयुक्त दुर्बिणीचा आनंद घेता येणार
वेधशाळेत १६, १४, १० आणि ६ इंच व्यासाच्या आरशांच्या दुर्बिणी बसविण्यात आल्या आहेत. या दुर्बिणी काँक्रीट पिलर्सवर बसविलेल्या असून एक बटण दाबताच छप्पर मागे सरकण्याची स्वयंचलित यंत्रणा आहे. सोलर फिल्टरयुक्त दुर्बिणीतून दिवसा सूर्यावरील सौरज्वाला व इतर घडामोडी पाहता येतात, तर संगणकाशी जोडलेल्या दुर्बिणीद्वारे आकाशातील दृश्यांचे छायाचित्रण आणि प्रोजेक्टरवर प्रात्यक्षिक सादरीकरणही करता येते. या वेधशाळेतून गुरू ग्रहाचे चंद्र, त्यावरील पट्टे, शनी ग्रहाची वलये तसेच विविध दीर्घिका स्पष्टपणे पाहता येतात. रात्री आकाश निरीक्षणासाठी विशेष सुविधा असून निवासासाठी स्वतंत्र खोल्या व डॉरमेटरीची सोय करण्यात आली आहे.