Thane : गणरायाच्या सुरक्षेसाठी मंडळे सज्ज! मोठ्या मूर्तीना पट्ट्यांचा आधार; खड्डेयुक्त रस्त्यांची खरी अडचण

मुंबईत गणेशमूर्ती पडल्याच्या दोन घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले आहेत. गणरायाला मंडपात नेताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी ठाण्यातील गणेश मंडळांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
Thane : गणरायाच्या सुरक्षेसाठी मंडळे सज्ज! मोठ्या मूर्तीना पट्ट्यांचा आधार; खड्डेयुक्त रस्त्यांची खरी अडचण
Thane : गणरायाच्या सुरक्षेसाठी मंडळे सज्ज! मोठ्या मूर्तीना पट्ट्यांचा आधार; खड्डेयुक्त रस्त्यांची खरी अडचणप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : मुंबईत गणेशमूर्ती पडल्याच्या दोन घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले आहेत. गणरायाला मंडपात नेताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी ठाण्यातील गणेश मंडळांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तीची वाहतूक करताना त्यांना मजबूत पट्ट्यांचा आधार दिला जात असून, वाहनाचा वेग कमी ठेवण्याबरोबरच रस्त्यातील खड्डे, चढ-उतार आणि वळणे लक्षात घेऊन सावधपणे मूर्ती नेली जात आहे. शुक्रवारी ठाण्यातील अनेक भागांत 'बाप्पाला काही होऊ नये' या भावनेतून मंडळांचे पदाधिकारी अक्षरशः जीव मुठीत धरून गणरायाची वाहतूक करताना दिसून आले.

गणेशोत्सव म्हटला की महिनाभर आधीपासूनच मंडळांची लगबग सुरू होते. आकर्षक देखावे, भव्य मंडप आणि मोठ्या गणेशमूर्ती हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. मात्र, ही मोठी मूर्ती मंडपापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे मंडळांसमोर मोठे आव्हान असते. मुंबईतील दोन घटनांमध्ये गणेशमूर्ती पडल्याचे समोर आल्यानंतर ठाण्यातील गणेश मंडळांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे.

मोठ्या गणेशमूर्ती वाहनावर ठेवताना त्या सुरक्षित राहाव्यात आणि प्रवासादरम्यान त्यांची हालचाल होऊ नये, यासाठी मजबूत पट्टे बांधण्यात येत आहेत. काही ठिकाणी अतिरिक्त दोरखंड आणि इतर आधारांचाही वापर केला जात आहे. वाहन अतिशय सावकाश पुढे नेले जात असून, मूर्तीचा तोल जाणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. मूर्ती घेऊन वाहन मार्गस्थ झाल्यानंतर मंडळाचे पदाधिकारी वाहनाच्या आजूबाजूला राहून प्रत्येक वळणावर लक्ष ठेवत आहेत. रस्त्यात अचानक खड्डा किंवा अडथळा आल्यास वाहन थांबवून पुढील मार्गाची पाहणी केली जात आहे.

'बाप्पा सुखरूप पोहोचला...' हाच मोठा दिलासा

गणेशमूर्ती मंडपात सुरक्षितपणे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. अनेक दिवसांची तयारी, मेहनत आणि उत्साह या एका क्षणात सार्थकी लागतो. त्यामुळे मुंबईतील घटनांनंतर ठाण्यातील गणेश मंडळांनी घेतलेली ही खबरदारी केवळ सुरक्षेचा उपाय नसून गणरायाविषयीची श्रद्धा आणि भावनाही अधोरेखित करणारी आहे.

जीव मुठीत धरून गणरायाची वाहतूक

ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्याने मोठ्या गणेशमूर्तीची वाहतूक करताना मंडळांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. गणरायाची मूर्ती घेऊन जाणारे वाहन खड्यात आदळल्यास मूर्तीचा तोल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहनचालकांना अत्यंत संथ गतीने वाहन चालवावे लागत आहे. 'रस्ते काहीही असोत, बाप्पाला सुरक्षितपणे मंडपात पोहोचवायचेच,' अशी भावना गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. ठाण्यातील अनेक भागांत 'बाप्पाला काही होऊ नये' या भावनेतून मंडळांचे पदाधिकारी अक्षरशः जीव मुठीत धरून गणरायाची वाहतूक करताना दिसून आले.

उत्साहापेक्षा सुरक्षेला प्राधान्य

गणेशोत्सवाच्या उत्साहात ढोल-ताशे, फटाक्यांचा आवाज आणि मिरवणुकीचा जल्लोष असतो. मात्र, यंदा मोठ्या गणेशमूर्तीच्या वाहतुकीदरम्यान सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. मूर्ती सुरक्षितपणे मंडपात पोहोचल्यानंतरच मंडळांच्या कार्यकर्त्यांना खरा दिलासा मिळणार आहे. "ही केवळ मूर्ती नाही, तर आमच्यासाठी हा गणराय आहे. वर्षभर ज्या बाप्पाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो, त्याला मंडपात नेताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, एवढीच काळजी आहे. मुंबईतील घटना पाहिल्यानंतर आम्ही अधिक खबरदारी घेत आहोत. रस्त्यांवर खड्डे असल्याने धोका वाढतो. त्यामुळे मूर्तीला पट्टे बांधून आणि वाहन सावकाश चालवत बाप्पाला सुरक्षितपणे मंडपात नेत आहोत," अशी भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in