Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष

सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०२६च्या उत्सवासाठी मंडप उभारणीकरिता ठाणे महापालिकेकडून आकारण्यात येणारे मंडप भाडे आणि अनामत रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव महासभेच्या निर्णयार्थ सादर करण्यात आला आहे.
Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष
Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०२६च्या उत्सवासाठी मंडप उभारणीकरिता ठाणे महापालिकेकडून आकारण्यात येणारे मंडप भाडे आणि अनामत रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव महासभेच्या निर्णयार्थ सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता देऊन तो महासभेसमोर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदा मंडळांना ही सवलत मिळणार का, याकडे उत्सव मंडळांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक १४ (अ)च्या नगरसेविका शीतल ढमाले यांनी ९ ऑगस्टला महापालिका आयुक्तांना पत्र देऊन गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव मंडळांचे मंडप भाडे व अनामत रक्कम माफ करण्याची मागणी केली होती. या आधीही गणेशोत्सव मंडळांच्या मंडप भाड्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मागील वर्षी खासदार नरेश म्हस्के यांनीदेखील मंडप भाडे माफ करण्याबाबत महापालिकेकडे पत्र दिले होते.

मागील वर्षी निर्णय होण्यास विलंब झाल्याने काही मंडळांकडून भाडे आणि अनामत रक्कम वसूल करण्यात आली. नंतर निर्णय झाल्यानंतर ही रक्कम परत करण्याची प्रक्रिया प्रशासनाला करावी लागली. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांच्या परवानगीची प्रक्रिया सुरू होण्याच्या किमान १५ ते २० दिवस आधीच मंडप भाडेमाफीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महासभेत यावर निर्णय घेतला जाणार असल्यामुळे मंडळे आणि भाविकांमध्येही सवलत मिळणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

महासभेची मंजुरी घेणे आवश्यक

ठाणे महापालिकेच्या २९ मार्च २०११ रोजीच्या महासभा ठरावानुसार सार्वजनिक ठिकाणी सण-उत्सवांसाठी तात्पुरते मंडप उभारण्यासाठी भाडे आणि अनामत रक्कम आकारण्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे ही रक्कम माफ करण्यासाठी महासभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, २०२१, २०२२, २०२३ आणि २०२४ या काळात शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना मंडप भाडे व अनामत रकमेतून सवलत देण्यात आली होती.

अतिक्रमण विभागाचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर

२०२५ मध्येही ठाणे महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेत ही रक्कम माफ केली होती. मात्र २०२६ साठी शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदाही मंडळांना भाडे व अनामत रकमेतून सवलत द्यायची झाल्यास महासभेचा धोरणात्मक निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अतिक्रमण विभागाने याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला होता. आयुक्तांनी प्रस्ताव महासभेसमोर निर्णयार्थ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महासभेत यावर काय निर्णय होतो, याकडे गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in