ठाणे-घोडबंदर ठप्प! पूर्णेकर हत्या प्रकरणाचे पडसाद; सात ते आठ तास वाहतुकीचा खोळंबा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील संतापाचा उद्रेक आणि त्यातून करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा मोठा फटका मंगळवारी रात्री हजारो प्रवाशांना बसला.
ठाणे-घोडबंदर ठप्प! पूर्णेकर हत्या प्रकरणाचे पडसाद; सात ते आठ तास वाहतुकीचा खोळंबा
ठाणे-घोडबंदर ठप्प! पूर्णेकर हत्या प्रकरणाचे पडसाद; सात ते आठ तास वाहतुकीचा खोळंबा
Published on: 

ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील संतापाचा उद्रेक आणि त्यातून करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा मोठा फटका मंगळवारी रात्री हजारो प्रवाशांना बसला. मानपाडा उड्डाणपुलाखाली झालेल्या आंदोलनामुळे ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई-नाशिक महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या आणि ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली. बसगाड्या कोंडीत अडकल्याने अनेक प्रवाशांना उतरून पायी प्रवास करावा लागला. अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या प्रवासासाठी एक ते दीड तासाहून अधिक वेळ लागत असल्याने नागरिकांचे हाल झाले.

पूर्णेकर हत्या प्रकरणातील संशयितांना अटक करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने मंगळवारी रात्री तीव्र स्वरूप धारण केले. पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पूर्णेकर कुटुंबीयांसह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर जमले.

मीनाक्षी राजेंद्र शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास मानपाडा उड्डाणपुलाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी टायर जाळण्याचाही प्रयत्न केल्याने तणाव वाढला. या आंदोलनामुळे सुमारे सात ते आठ तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांनी धरली पायी घरची वाट!

घोडबंदर मार्गावरील कोंडीत बसगाड्या अडकल्याने कामावरून घरी परतणारे कर्मचारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पायी जाण्याची वेळ आली. हिरानंदानी इस्टेट ते हिरानंदानी मेडोज परिसरातही वाहतुकीचा ताण जाणवला. अनेकांनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून पायी जाणे पसंत केले.

ठाणे-घोडबंदर ठप्प! पूर्णेकर हत्या प्रकरणाचे पडसाद; सात ते आठ तास वाहतुकीचा खोळंबा
Thane : पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी राजेंद्र शिंदे यांची चौकशी; पप्या शिंदेला न्यायालयीन कोठडी

महामार्गावरही परिणाम

मानपाड्यातील आंदोलनाचे पडसाद मुंबई-नाशिक महामार्गावरही उमटले. अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया गेले. न्यायाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांना तासन्‌तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in