
ठाणे : घोडबंदरवासीयांना वाहतूककोंडीतून दिलासा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला. घोडबंदर रस्त्यावर रात्री १२ वाजल्यानंतरच जड वाहनांना प्रवेश देण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले.
वाहतूककोंडीमुळे घोडबंदर परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना शिंदे यांनी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या. आवश्यकतेनुसार वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.
या जड वाहनांसाठी आच्छाड व चिंचोटी परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. सर्व यंत्रणांच्या समन्वयाची जबाबदारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आली असून, वेळेचे बंधन न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला. या बैठकीस ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, जस्टीस फॉर घोडबंदर रोडचे पंकज सिन्हा आणि गिरीश पाटील उपस्थित होते.
नियोजन काटेकोरपणे राबवावे
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, पालघर जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन, मीरा-भाईंदर महापालिका तसेच जेएनपीटी प्रशासनाशी समन्वय साधून हे नियोजन काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले. जेएनपीटीकडून घोडबंदर रस्त्यावर येणाऱ्या जड वाहनांना रात्री १२ नंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या. तसेच अहमदाबादकडून घोडबंदर रोडकडे येणारी वाहनेही रात्री १२ नंतरच सोडण्याचे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले.