
ठाणे : घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करीत असतांना अस्तित्वातील स्टॉर्म वॉटर ड्रेन व नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेन जोडलेले नसल्याने पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन घोडबंदर परिसर पाण्याखाली जाण्याची भीती महापालिकेने व्यक्त केली असून त्या संदर्भात पत्रव्यवहार करून एमएमआरडीएला धोक्याची जाणीव करून दिली आहे.
पावसाळ्यात महापालिकेच्या रस्त्यांऐवजी इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडत असतात. परंतु त्याचे खापर हे महापालिकेवर फोडले जात असते. त्यातही महापालिकेकडूनच त्या रस्त्यावरील खड्डे बुजविले जात असल्याचे चित्र ठाण्यात दरवर्षी पहावयास मिळत असते. त्यामुळे ठाणे महापालिकेने आता एमएमआरडीए आणि मेट्रोला पत्र धाडले असून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे करून घ्यावीत, तसेच इतर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. त्यातही घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करीत असतांना अस्तित्वातील स्टॉर्म वॉटर ड्रेन व नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेन जोडलेले नसल्याने पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे.
दरवर्षी या ठिकाणी उड्डाणपुलावर जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने येथील रस्ते, उड्डाणपूल वारंवार नादुरुस्त होतात. तसेच या रस्त्यांवर खड्डे सुद्धा पडत असतात. त्यामुळे वाहतूककोंडीतही भर पडत असल्याची ठाणे महापालिकेने केली आहे. त्यातही अशा वेळेस अपघात देखील होण्याची शक्यता असते. याशिवाय घोडबंदर भागात सध्या सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामध्ये बऱ्याच ठिकाणी मुख्य रस्ता व सेवा रस्त्यामधील स्टॉर्म वॉटर ड्रेन तोडण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
रस्त्याच्या सीमारेषेवर नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेनचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु अस्तित्वातील स्टॉर्म वॉटर ड्रेन व नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेन जोडलेले नसल्याने पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही पालिकेने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे याची दक्षता घेण्यात यावी असेही त्यांना या पत्रात म्हटले आहे. शिवाय रस्त्याच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या भागात काँक्रीटीकरणाचे कामही पावसाळ्यापूर्वी करावे, असेही नमूद केले आहे.
मेट्रोलाही पत्र
दूसरीकडे मेट्रो प्राधिकरणाला देखील महापालिकेने पत्र धाडले असून, मेट्रो चार ए ही कासारवडवली ते गायमुख व मेट्रो पाच ही मार्गिका कापुरबावडी ते बाळकुम या प्रमाणे आहे. या मार्गिकांच्या कामामुळे लगतच्या रस्त्यांवर खड्डे पडलेले दुरुस्त करावेत, असे सांगितले आहे. तसेच इतर उपाय योजना पावसाळ्यापूर्वी करण्यात याव्यात असेही नमूद करण्यात आले आहे.
अशी होत आहेत कामे
ठाणे महापालिका हद्दीत पूर्व द्रुतगती महामार्ग - आनंद नगर जंक्शन ते माजिवडा नाका (रस्ता) - ५ किमी, सेंट्रल रेल्वे आरओबी- ८५० मी. तीन हात नाका उड्डाणपूल - ६५० मी., मुंब्रा बायपास वाय जंक्शन उड्डाणपूल ५३० मीटर आणि घोडबंदर सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये विलीनीकरण करणे (कापूरबावडी ते गायमुख) १०.५० किमी या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश होत आहे, याची देखभाल एमएमआरडीएकडे आहे. त्यामुळे या रस्त्यांची देखभाल, तसेच पावसाळ्यापूर्वीची कामे करून घ्यावीत.