अतुल जाधव/ ठाणे
घोडबंदर रोड येथे दररोज होत असलेल्या वाहतूककोंडीमधून ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या अथक प्रयत्नातून मागील पंधरा दिवसांत घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. घोडबंदर रोड वाहतूककोंडीपासून मुक्त करण्यात आला असून यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्ते यावर होणाऱ्या वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी उपाययोजना तसेच अडचणी याचा विचार करण्यासाठी बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते. घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीच्या समस्येची तड लावण्यासाठी कृती आराखड्यानुसार विविध यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखून उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पंकज शिरसाट यांनी या बैठकीत दिली. तसेच, सध्या असलेल्या अडचणी व त्यावरील संभाव्य तोडगे यांचे विवेचनही त्यांनी केले.
१२.५ टन क्षमतेच्या पुढील वाहनांचा अवजड वाहनांमध्ये समावेश होत असतो. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नाहीत. त्यामुळे तशी काही मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. गायमुख घाट, भाईंदर पाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजूनही वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली.
दीडशे ते दोनशे टनाच्या गाड्या गायमुख घाटातून जातात त्यामुळे हा मार्ग आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, कापूरबावडी- माजिवडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या यू टर्न ते विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेट्रोलगत सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामांमुळे तेथील मार्गिका छोट्या झाल्या असल्याने अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली.
ठाण्यातही 'टायर किलर'चा प्रयोग
रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहने चालवण्याच्या प्रकारांमुळे होणारे अपघात, वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर 'टायर किलर' बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत. त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे 'टायर किलर' बसवण्यात येतील. अशा प्रकारचे 'टायर किलर' असल्याची माहिती देणारे बोर्ड १०० ते २०० मीटर आधीपासून लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश असल्याची खात्री केली जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर मग हे 'टायर किलर' बसवले जातील.