घोडबंदरला पाण्यासाठी टँकरचा आधार; टाक्या आहेत, पंप आहेत; तरीही पाणी नाही! नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

घोडबंदर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा महासभेत ऐरणीवर आला. कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात होणारा पाणीपुरवठा, टँकरच्या पाण्यावर नागरिकांची वाढती निर्भरता, बंद पम्प, रखडलेल्या पाण्याच्या टाक्या तसेच पाणी उपलब्धतेचा विचार न करता दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
Thane : घोडबंदरला पाण्यासाठी टँकरचा आधार; टाक्या आहेत, पंप आहेत; तरीही पाणी नाही! नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर
Thane : घोडबंदरला पाण्यासाठी टँकरचा आधार; टाक्या आहेत, पंप आहेत; तरीही पाणी नाही! नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवरप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : घोडबंदर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा महासभेत ऐरणीवर आला. कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात होणारा पाणीपुरवठा, टँकरच्या पाण्यावर नागरिकांची वाढती निर्भरता, बंद पम्प, रखडलेल्या पाण्याच्या टाक्या तसेच पाणी उपलब्धतेचा विचार न करता दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पाणीप्रश्न तातडीने सोडविला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही सदस्यांनी दिला.

घोडबंदर परिसरातील पाणीप्रश्न मांडताना अनिता ठाकूर यांनी अनेक भागांत नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे सांगितले. काही भागांत अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, हा प्रश्न नागरिकांसाठी गंभीर बनला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कमळ चौधरी यांनी पाण्याची टाकी असूनही त्यात पाणी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. पम्पही बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास पुढील महासभेत आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

यज्ञा भोईर यांनी पाणीटंचाईची समस्या अद्याप कायम असल्याचे सांगत प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप केला. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा कधी मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पाइपलाइनच्या कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याचा मुद्दा नारायण पवार यांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे ठरले असतानाही त्यालाच पुन्हा कामे का दिली जात आहेत? त्याच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

श्रीनगरमधील पाण्याच्या टाकीचा प्रश्नही महासभेत गाजला. जुनी टाकी पाडून नवीन टाकी उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. मात्र, निविदा प्रक्रियेला दीड वर्ष उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, अशी माहिती मनोज शिंदे यांनी दिली.

पाणी नाही, तरी बांधकामांना परवानगी का?

संजय भोईर यांनी शहरातील विकासाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या भागात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी विकासकांना मोठ्या इमारती उभारण्याची परवानगी दिली जाते. बांधकाम आराखडा मंजूर करताना त्या भागातील पाण्याचा स्रोत कुठे आहे, याचा विचार केला जातो का? पाणीपुरवठ्याचे नियोजन काय आहे? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. यावेळी कृष्णनिला ठेक्याचाही मुद्दा त्यांनी मांडला.

प्रभागनिहाय समस्या सोडविण्याचे आश्वासन

सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे सुरू असताना त्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे एकीकडे नव्या इमारती उभ्या राहत असताना दुसरीकडे जुन्या वस्त्यांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. घोडबंदर परिसरातील पाण्याच्या टाक्या, पंप आणि पाइपलाइनची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महासभेत करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in